मिरजेत महापालिका कर्मचारी निलंबित
By admin | Published: March 3, 2015 10:54 PM2015-03-03T22:54:09+5:302015-03-03T23:02:48+5:30
महापौरांचा दणका : हजेरीपत्रकात घोळ
मिरज : मिरजेत महापालिका कार्यालयात हजेरी रजिस्टरमध्ये आगाऊ हजेरी नोंदविल्याप्रकरणी काडाप्पा कोळी या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला आज (मंगळवारी) निलंबित करण्यात आले.
महापौर विवेक कांबळे यांनी सोमवारी मिरज विभागीय कार्यालयास अचानक दिलेल्या भेटीवेळी हजेरी रजिस्टरची तपासणी केली होती. बांधकाम विभागात मेस्त्री म्हणून काम करणाऱ्या काडाप्पा कोळी याने हजेरी रजिस्टरमध्ये पुढील दोन दिवसाच्या सह्या केल्याचे आढळले. महापौरांनी याबाबत प्रशासन विभागास कारवाईचे आदेश दिल्यानंतर कामगार अधिकारी कल्लाप्पा हळिंगळे यांनी हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले. काडाप्पा कोळी याच्यावर आज निलंबनाचा आदेश बजाविण्यात आला.
महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात हजेरी रजिस्टरमध्ये खाडाखोड व आगाऊ हजेरी नोंदविण्याचे प्रकार होत असल्याने बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र हजेरी नोंद यंत्र वारंवार बंद पाडण्यात येऊन, पुन्हा हजेरी रजिस्टरची पध्दत सुरू केली होती. (वार्ताहर)