प्रतिमा चषकावर पश्चिम रेल्वेची मोहोर
By admin | Published: May 5, 2017 10:35 PM2017-05-05T22:35:01+5:302017-05-05T22:56:37+5:30
अंतिम सामन्यात दक्षिण-मध्य रेल्वेवर ४ गडी राखून केली मात
कोल्हापूर : रामभाऊ परूळेकर ट्रस्ट, शाहूपुरी जिमखाना व शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘प्रतिमा वुमेन्स टी-२०’ क्रिकेट स्पर्धेत पश्चिम रेल्वे संघाने दक्षिण-मध्य रेल्वे संघाचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकाविले. ‘स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून पश्चिम रेल्वेच्या सुलक्षणा नाईक हिला गौरविण्यात आले. शाहूपुरी जिमखाना मैदान येथे प्रथम फलंदाजी करताना दक्षिण-मध्य रेल्वे संघाने २० षटकांत ७ बाद १३९ धावा केल्या. त्यात ममता कनोजिया ४८, अरुणघथी रेड्डी २७, स्वागतिका रथ १८ धावा केल्या. गोलंदाजी करताना पश्चिम रेल्वेकडून प्रीती बोस व आकांक्षा कोहली या दोघींनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर ललिता शर्मा, अनुजा पाटील या दोघींनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पश्चिम रेल्वेने हा सामना २० षटकांत ६ बाद १४० धावा करत विजयासह अजिंक्यपद पटकाविले. त्यात सुलक्षणा नाईक हिने ५३ चेंडूत ५० धावा केल्या तर रिमा मल्होत्रा हिने १९ चेंडूत २६ धावा करत मोलाची साथ दिली. बबिता मीना हिने ११ चेंडूत १८ धावांची दमदार खेळी केली. गोलंदाजी करताना दक्षिण मध्यकडून गोहर सुल्तान हिला २ बळी घेता आले. ‘सामनावीर’ व ‘स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून पश्चिम रेल्वेच्या सुलक्षणा नाईक हिचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार सतेज पाटील व महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रतिमा पाटील, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, शारंगधर देशमुख, राहुल माने, तेजस पाटील, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, शाहूपुरी जिमखानाचे अध्यक्ष विनोद कांबोज, स्पर्धा कमिटी अध्यक्षा श्वेता परूळेकर, रमेश पुरेकर, सचिव संजय शेटे, राजेंद्र मिठारी आदी उपस्थित होते. यावेळी माजी रणजीपटू शाम ओक यांचा सत्कार करण्यात आला. ---------- फोटो : ०५०५२०१७-कोल-क्रिकेट फोटोओळी : शाहूपुरी जिमखाना येथे झालेल्या प्रतिमा चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या पश्चिम रेल्वे संघासोबत आमदार सतेज पाटील, महापौर हसिना फरास, प्रतिमा पाटील, विनोद कांबोज, संजय शेटे, श्वेता परूळेकर, डॉ. संदीप नेजदार, रमेश पुरेकर आदी उपस्थित होते.