Kolhapur: गडहिंग्लज खनिकर्ममध्ये कोटीचा अपहार, महसूल सहायकास खुलासा करण्याची नोटीस
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 9, 2024 02:04 PM2024-09-09T14:04:36+5:302024-09-09T14:05:06+5:30
याबाबत ऑडिट व कागदपत्रांची तपासणी सुरू
इंदुमती गणेश
कोल्हापूर : गडहिंग्लज खनिकर्म विभागात झालेल्या २०१८ ते २०२२ या कालावधीतील व्यवहारांच्या लेखापरीक्षणात १ कोटी १५ लाख २३ हजार ७९८ इतक्या रकमेची तफावत आढळून आली आहे. याप्रकरणी गडहिंग्लजचे तत्कालीन महसूल सहायक (गौण खनिज) लखन खाडे (सध्या नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालय कार्यासन ७ गृह) यांना खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली असून याबाबत ऑडिट व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
सध्या ही तफावत दिसत असली तरी याप्रकरणी आपण संयुक्तिक स्पष्टीकरण न केल्यास हा अपहार समजूनच आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल अंतर्गत कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जाईल असे गडहिंग्लजच्या तहसीलदारांनी १६ ऑगस्टला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. खाडे यांनी कागदपत्रे देण्यास मुदतवाढ मागितली आहे.
खनिकर्म विभागाकडे रॉयल्टीपोटी जो महसूल जमा होतो त्यातील १० टक्के रक्कम जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) कडे दिले जाते. त्यातून क्रशर ज्या भागात आहे त्या भागातील रस्ते व अनुषंगिक विकासकामे या निधीतून केली जातात. त्याच निधीवर डल्ला मारल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. गडहिंग्लजमधील महसुली जमा लेख्यांमध्ये २०१८ ते २०२२ या काळातील लेखा परीक्षणात १८१ प्रकरणांमध्ये एक कोटी १५ लाख रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी या खात्यावर जमा केल्याचे पुरावे सादर झालेले नाहीत. त्यापैकी ७६ प्रकरणांमध्ये ३९ लाख ४६ हजार ६३६ रुपयांचा अहवाल सादर झाला आहे. अजूनही १०५ प्रकरणांमध्ये ७५ लाख ७७ हजार १६२ इतक्या रकमेचा ताळमेळ संबंधित विभागाला लागलेला नाही.
या सर्व प्रकरणांच्या संचिका तपासल्या असताना त्यामध्ये जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी जिल्हा कार्यालयाला भरणा केल्याची कागदपत्रे दिसून येत नाहीत. या कालावधीत गडहिंग्लजमध्ये गौणखनिज संकलनाकडे महसूल सहायक असलेल्या खाडे यांना प्रलंबित त्रुटीबाबत प्रत्यक्ष जबाबदार आहात, अशी नोटीस पाठवून याबाबत खुलासा व कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी त्यास उत्तर दिलेले नाहीच; शिवाय यापूर्वी दिलेल्या लेखी सूचनेला उत्तरदेखील दिलेले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (पूर्वाध)
३९ लाखांचे पुरावे मागितले
१ कोटीपैकी ३९ लाख ४६ हजार ६३६ रुपयांच्या सादर केलेल्या अहवालाला लेखाधिकाऱ्यांची अजून स्वीकृती मिळालेली नाही. या ७६ प्रकरणांमधील रक्कम जिल्हा कार्यालयाला जमा केल्याचे ठोस पुरावे लेखापरीक्षण पथकाने मागितले आहे. त्यामुळे सर्व १८१ प्रकरणांमध्ये पूर्तता करणे प्रलंबित असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
गौण खनिज निधीप्रकरणी लेखापरीक्षण, कागदपत्रांची छाननी सुरू आहे. हा प्रशासनाचा अंतर्गत विषय असून पुरावे तपासल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. -ऋषिकेत शेळके, तहसीलदार, गडहिंग्लज