..अन्यथा आनेवाडी टोलनाक्यावर अनर्थ!--उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:48 PM2017-09-27T23:48:48+5:302017-09-27T23:50:55+5:30
सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही,
लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. स्थानिक कर्मचाºयांना कामावरून काढून टाकले तर, अनर्थ घडेल,’ असा सज्जड दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा आनेवाडी टोलनाका दि. १ आॅक्टोबरपासून अशोका स्थापत्य कंपनीकड़ून काढून घेत कोल्हापूरच्या मक्रोलाइन कंपनीकडे येथील व्यवस्थापनकडे जाणार असल्याचे वृत्त बुधवारी फक्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्तामुळे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांना आनेवाडी येथील स्थानिक कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
‘काहीही झाले तरी टोलनाका अगोदरचेच लोक चालवणार आहेत. कारण दुसºया कुणाला हा टोलनाका अजिबात चालवता येणार नाही, नाही तर रिलायन्स कंपनीला मोठा भुर्दंड बसणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मी संबंधित कोण आहेत, त्यांच्याशी लवकर बोलून घेणार आहे आणि येथील भूमिपुत्र कामगार वर्गावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका,’ असे आश्वासन येथे उपस्थित कामगार वर्गाला दिले. बाहेरच्या जिल्ह्यातून कंत्राटदार येणार असल्याने कामगार वर्गही पर जिल्ह्यातून आणले जाणार असल्याने येथील भूमिपुत्र कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार राहणार आहे. रिलायन्स कंपनीकडे याबाबत विचारणा केली तरीही कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे कामगारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी भावना व्यक्त करणारे निवेदन येथील कामगारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन दिले.
तर टोल नाका चालू देणार नाही..
आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळाली आहे. व्यवस्थापन बदलो किंवा न बदलो, स्थानिक कर्मचाºयांवर या बदलामुळे गदा येणार असेल तर हा टोल नाका चालू देणार नाही, तुम्हाला उद्रेक पाहायचा असेल तर पाहा.. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले.