प्रशासनाचा घोळ, प्रवाशांचे हाल
By admin | Published: July 24, 2014 12:06 AM2014-07-24T00:06:22+5:302014-07-24T00:08:56+5:30
एस. टी., महापालिका, आरटीओचे दुर्लक्ष : ऐन पावसाळ्यात प्रवाशांना ताप
कोल्हापूर : संततधार पाऊस... नाकाला रुमाल लावायला भाग पाडणारी दुर्गंधी... अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य... अशा परिस्थितीमध्ये शेकडो प्रवाशांना दररोज एस. टी. बसची वाट पाहावी लागते. हे चित्र कुठल्या ग्रामीण भागातील नसून, शहरातील गजबजलेल्या टाउन हॉल बसथांब्यानजीकचे. निवारा नसलेला हा बसथांबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सी.पी.आर. चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने ‘आरटीओ’ने टाउन हॉल येथील एस.टी. बसथांबा हलविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार येथील थांबा काही दिवसांपूर्वी हलविण्यात आला. तो शंभर फुटांवर नेण्यात आला. याठिकाणी पिक-अड शेड बांधण्यासाठी एस. टी.ने महापालिकेकडे परवानगी मागितली; परंतु महापालिकेने याला नकार दिल्याने या ठिकाणी पिक-अप शेड उभे राहिलेच नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पन्हाळा, जोतिबा, मलकापूर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पावसाचा मारा सोसत व शेजारील स्वच्छतागृहातील घाणेरडा वास सहन करीत एस.टी.साठी तिष्ठत थांबावे लागत आहे. यामध्ये नोकरदार, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शेतकरी अशा प्रवाशांचा समावेश आहे. अलीकडे दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने छत्र्या घेऊन निवाराविना प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्याही उडून जाव्यात, अशी स्थिती आहे. ‘आरटीओ,’ ‘महापालिका’ व ‘एस.टी.’ यांच्या त्रांगड्यात दररोज शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी जागेची व्यवस्था करा, अन्यथा पूर्ववत पिक-अप शेड थांबा हलवू, असा इशारा ‘एस.टी.’ प्रशासनाने ‘आरटीओ’ कार्यालयाला पत्राद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)
-निवारा नसलेला एस.टी बसथांबा
-टाउन हॉल येथील एस.टी. बस थांबा हलविल्याने प्रवाशांचे हाल
-आरटीओ, महापालिका, एस.टी. यांच्या त्रांगड्याने सोसावा लागतोय त्रास