सर्वेक्षकाअभावी थांबली खाणपट्ट्यांची मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:48 AM2018-12-10T00:48:57+5:302018-12-10T00:49:01+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वर्षभरात किती उत्खनन झाले?, किती रॉयल्टी भरली? यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वर्षभरात किती उत्खनन झाले?, किती रॉयल्टी भरली? यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा खनिकर्म विभागाकडून दगड खाणींची मोजणी केली जाते. यंदाची मोजणी अद्याप झालेली नाही. खनिकर्म विभागाला सर्व्हेअर (सर्वेक्षक) उपलब्ध होत नसल्याने ही मोजणी रखडली आहे. या कार्यालयात कायमस्वरूपी हे पद असावे, यासाठी दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे मागणी केली आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.
जिल्ह्यात ६० दगडखाणी आहेत. त्यांची दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागाकडून मोजणी केली जाते. यामध्ये भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाच्या सर्व्हेअर (सर्वेक्षक) कडून हे काम करून घेतले जाते. ‘ईपीएस’ मशीनद्वारे ही मोजणी करून त्याचे मोजमाप टन किंवा ब्रासमध्ये केले जाते; कारण खनिकर्म कार्यालयाकडे हे पद मंजूर नसल्याने त्यांना ‘भूविज्ञान’च्या सर्वेक्षकावर अवलंबून राहावे लागते. ‘भू विज्ञान ’ कार्यालयाच्या अंतर्गत १२ जिल्हे असून, त्यांचाही व्याप मोठा आहे; त्यामुळे त्यांचे काम झाल्यावरच सर्वेक्षक उपलब्ध होते; त्यामुळे त्यांच्या वेळेनुसारच मोजणीचे काम करावे लागते. बहुतांश राज्यभरातील जिल्हा खनिकर्म कार्यालयातील हे चित्र आहे.
वर्षातून किमान एकदा पावसाळ्यापूर्वी ही मोजणी होणे आवश्यक आहे; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात यंदाची खाणपट्ट्यांची मोजणी अद्याप झालेली नाही. सर्वेक्षकांची उपलब्धता नसल्याने ही मोजणी रखडली आहे.
‘भूविज्ञान’ कार्यालयाकडेच्या कामातच सर्वेक्षक अडकल्याने ते पूर्ण झाल्यावरच उपलब्ध होणार आहे; त्यामुळे आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी होणारी ही अडचण लक्षात घेता जिल्हा खनिकर्म विभागासाठी कायमस्वरूपी एका सर्वेक्षकाचे पद मंजूर करावे, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने राज्य शासनाला केली आहे; परंतु त्याकडे शासनाने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. वेळेवर ही मोजणी होत नसल्याने दगडखाणींमधून नेमके किती उत्खनन झाले? त्याच्याकडून किती रॉयल्टी आकारायची याबाबत समस्या निर्माण होत असतात. जर हक्काचा सर्वेक्षक मिळाला, तर दर तीन महिन्यांतून एकदा खाणपट्ट्यांची मोजणी होऊन खनिकर्म विभागाचे काम सोपे होऊ शकते, असे सूत्राकडून सांगण्यात आले.