चंद्राच्या पुढे जाणे हा चांद्रयान मोहिमेचा उद्देश -धनेश बोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:44 AM2019-12-08T00:44:37+5:302019-12-08T00:46:05+5:30
देशप्रेमासाठी अनेकजण आपापल्या परीने काम करीत असतात. तसेच जगामध्ये आपल्या देशाचे नाव उज्ज्वल राहावे, यासाठी नेहमी धडपडणाऱ्या वैज्ञानिक विभागात मी करिअर निवडले. - धनेश सुनील बोरा
अतुल आंबी ।
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद
उद्योग, व्यवसाय यासह डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी होण्यासाठी अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक धडपडत असतात. मात्र, या सर्वांपेक्षा वेगळे क्षेत्र निवडून आपला व देशाचा नावलौकिक करता येतो, हे दाखवून देत चांद्रयान ३ मोहिमेत निवड झालेल्या इचलकरंजीतील धनेश बोरा या युवा संशोधकाची घेतलेली मुलाखत.
प्रश्न : या क्षेत्रात तसेच मोहिमेत कसे सहभागी झालात?
उत्तर : माझे शिक्षण बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन झाले आहे. त्याचबरोबर रॉकेट सायन्स व सॅटेलाईट कम्युनिकेशनचे कोर्स केले. त्यानंतर इस्रोची परीक्षा दिली. इस्रोचे संचालक डॉ. सतीशराव यांनी अहमदाबाद येथे मुलाखतीतून निवड केली. त्यामुळे देशसेवा करण्याची मला संधी मिळाली.
प्रश्न : चांद्रयान ३ मधील तुमच्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे?
उत्तर : नोव्हेंबर २०२० साली चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. त्यामध्ये लागणारे अतिसूक्ष्म उपग्रह व सेन्सर तयार करण्याची जबाबदारी आमच्या टीमवर सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये अतिशय तंतोतंत काम करणारे व वजनाने अतिशय हलके असे तंत्रज्ञान वापरून उपग्रह तयार करण्यात येणार आहेत. या स्वरूपाचे उपग्रह मंगळावर पोहोचण्यासाठी वापरण्यात आले होते. कमी खर्चात मंगळावर पोहोचणारा भारत हा पहिला एकमेव देश ठरला आहे.
प्रश्न : चांद्रयान ३ चे नेमके काम काय व कसे?
उत्तर : चांद्रयान ३ चंद्रावर पोहोचल्यानंतर तेथील माती परीक्षण, पाणी, हवा, जीवसृष्टी कशी असू शकते, याबाबत अभ्यास करून त्याठिकाणी एखादे सेंटर उभारून तेथून पुढील ग्रहांचा अभ्यास करणे हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे इतर ग्रहांवरील जीवसृष्टी, पाणी, हवामान, त्यांचे सूत्र काय आहे, याचा शोध घेणे, अभ्यास करणे सोपे होणार आहे.
‘रोबो रायटर’चा निर्माता
धनेश यांची रोबो रायटरचा निर्माता अशीही वेगळी ओळख आहे. सध्या कोल्हापुरात त्या रोबोमध्ये प्रगती व निर्मिती सुरू आहे. त्याचाही अनेकांना लाभ होणार आहे. धनेश बोरा या युवा उद्योजकांना अनेक राष्टÑीय, आंतरराष्टÑीय व स्थानिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये रशियन फेडरेशन, रोटरी क्लब, नॅशनल अंध संस्था, शिवम, गुरूदेव सेवा मंडळ अशा अनेक संस्थांचा समावेश आहे.