मतिमंद मुलीचा विनयभंग, कामगारास शिक्षा
By admin | Published: March 15, 2017 06:12 PM2017-03-15T18:12:15+5:302017-03-15T18:12:15+5:30
चॉकलेटचे आमिष दाखवून कृत्य : कागल येथील घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : यशवंत किल्ला, कागल येथे अल्पवयीन मतिमंद मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी आरोपीस बुधवारी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपी सोनू जयप्रकाश ठाकूर (वय २३, रा. कागल) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, फिर्यादी हे घरी पत्नी, दोन मुली, मुलासह राहत आहेत. सेंंट्रिंग काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या घराजवळ मेहुणा पत्नीसह राहत असून, ते कंत्राटदार आहेत. त्यांच्याजवळ आरोपी सोनू ठाकूर हा चार वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होता. तो त्यांच्याच घरी राहत असे. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांचा व आरोपीचा चांगला परिचय असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. दि. २० एप्रिल २०१५ रोजी रात्री आठच्या सुमारास मुलीचे वडील व पत्नी घरी असताना मेहुण्याच्या मुलीने सोनू ठाकूर हा मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून किल्ल्यामध्ये घेऊन गेला असल्याचे सांगितले. या सर्वांनी किल्ल्यामध्ये जाऊन पाहिले असता तो अंधारात मुलीला घेऊन बसला होता. मुलीच्या वडिलांना पाहून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी पकडून त्याला कागल पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील प्रतिभा जयकर-जाधव यांनी गुन्हा शाबित करण्यासाठी एकूण नऊ साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.