चुकांचा ‘पंच’नामा करावाच लागेल !

By admin | Published: April 29, 2015 11:42 PM2015-04-29T23:42:48+5:302015-04-30T00:22:12+5:30

फुटबॉल सामन्यातील हाणामारी : खेळाडू, प्रेक्षकांबरोबरच इतर घटकांच्या चुकाही सुधारणे गरजेचे ‘केएसए’ची भूमिका कशी चुकते ?

The mistakes must be made in the 'Punch'! | चुकांचा ‘पंच’नामा करावाच लागेल !

चुकांचा ‘पंच’नामा करावाच लागेल !

Next



कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन अर्थात केएसए ही कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रातील ‘फादर संस्था’ आहे. या संस्थेचे फुटबॉल स्पर्धेवर त्यातील सामन्यांवर आणि खेळाडूंवर नियंत्रण असलेच पाहिजे, परंतु तसे ते आता राहिलेले नाही. मुळात या संस्थेचे पदाधिकारी वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांचा उत्साहच कमी झालेला आहे. संस्थेच काम करणारे पदाधिकारी निष्पक्ष असावेत, अशी अपेक्षा असताना काही पदाधिकारी हे थेट संघांशी, खेळाडूंशी जोडलेले गेलेले आहेत. त्याचा परिणाम निर्णय घेण्यावर होतो. ‘केएसए’चे बोटचेपे, अवसानघातकी व व्यक्तिसापेक्ष धोरण असल्याने मैदानावरील व बाहेरील राडा होण्यास कारणीभूत ठरत आहे. मैदानावर खेळाडू धिंगाणा घालतात. त्यावेळी ‘केएसए’चे पदाधिकारी कडक भूमिका घेताना दिसत नाहीत. कारवाई करण्याचा प्रसंग आलाच, तर संघ कोणता आहे, खेळाडू कोणता आहे, हे आधी पाहिले जाते आणि मग कारवाईचे हत्यार उपसले जाते. खमक्या संघ अथवा खेळाडू असेल, तर कारवाई करण्याचे धाडस संस्था दाखवत नाही आणि ज्यांच्या मागे कोणी खमक्या नाही, अशा संघावर किंवा खेळाडूंवर फक्त जुजबी कारवाई केली जाते. एखाद्या संघावर तसेच खेळाडूंवर त्याने केलेल्या गैरकृत्याला जबाबदार धरून काही महिन्यांसाठी कारवाई केल्याचा प्रकार कधी घडलेला नाही. पंचांकडून आलेल्या अहवालावर तातडीने तसेच कठोर निर्णय घेण्याची क्षमता एकाही पदाधिकाऱ्याकडे नाही. ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशीच भूमिका ‘केएसए’ची राहिली आहे.

कोल्हापूर : शाहू स्टेडियमवरील फुटबॉलचा सामना आणि समर्थकांमधील हाणामारी हे आता नेहमीचेच झाले आहे. फुटबॉल स्पर्धेत, सामन्यात वाद झाला नाही अथवा ती निर्विघ्नपणे पार पडली, अशी एकही स्पर्धा होत नाही. गेली काही वर्षे असल्या प्रकाराने कोल्हापूरचा फुटबॉल हा खेळ पूर्णत: बदनाम झाला आहे. त्याला संघातील खेळाडू, संघांचे समर्थक आणि तालमींमधील वाईट पद्धतीने सुरू असलेली ईर्ष्या तर कारणीभूत आहेच; पण त्याचबरोबरीने फुटबॉलशी जोडले गेलेले अनेक घटकही तितकेच जबाबदार आहेत. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे कोण कशाप्रकारे चुकतो याचे विश्लेषण होणे गरजेचे बनले आहे. विश्लेषणानुसार जर आपल्यामध्ये सकारात्मक बदल केला आणि सर्वच घटकांनी अत्यंत निरपेक्षवृत्तीने तसेच नि:स्वार्थी भावनेने काम करायचे ठरविले, तरच फुटबॉलला भवितव्य आहे, अन्यथा शतकी परंपरा असलेला हा खेळ बंद पडेल.


पंचांचा दोष काय आहे ?
फुटबॉलच्या मैदानावर काम करणारा पंच हा ‘न्यायाधीश’ असतो. त्यामुळे तो निष्पक्ष आणि निरपेक्ष असलाच पाहिजे. तो पूर्वग्रहदूषित असता कामा नये; परंतु फुटबॉलशौकीनांचा हा विश्वास कोल्हापुरातील पंचानी सांभाळला आहे का, असा प्रश्न विचारला तर अनेक जण नकारघंटाच वाजवतील. सामन्याचे त्रयस्थ म्हणून निरीक्षण करण्याची जबाबदारी पंचावर असते. मैदानावरील त्यांच्या कामगिरीवर हजारो फुटबॉलशौकीनांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे रेफ्रींच्या चुका पटकन लक्षात येतात. एखादा खेळाडू शिस्त मोडून खेळत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यास टाळणे हा कसला प्रकार आहे ? जर असे घडले तर दुसऱ्या बाजूचे खेळाडू, समर्थक साहजिकच संतप्त होतात. काही रेफ्री विशिष्ट सामन्यांचीच का मागणी करतात, याचा कोणीही आणि कधीही गांभीर्याने विचार केलेला नाही. एखाद्या सामन्यात वाद होऊ शकतो, अशा सामन्यांसाठी कनिष्ठ दर्जाचे रेफ्री का नियुक्त केले जातात ? हेही तपासण्याची आवश्यकता आहे. एखादी स्पर्धा सुरू असताना रेफ्रींनी स्वत:ची आचारसंहिता तयार केली पाहिजे, सामन्याच्या काळात रेफरी कोठे असतात, कोणाच्या सोबत असतात यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. मैदानावर वाद निर्माण व्हायला अनेक वेळा रेफरींचा निर्णयच कारणीभूत ठरला असल्याचे बऱ्याचवेळा स्पष्ट झाले आहे.


कोच, मॅनेजर कसे वागतात ?
एखाद्या संघाचा मॅनेजर हा ‘मुख्याध्यापक’ आणि कोच हा ‘शिक्षक’ असतो परंतु मॅनेजर व कोच नेमके हेच विसरलेले आहेत. संघाच्या कोच व मॅनेजरना जर संघावर स्वत:चे नियंत्रणच ठेवता येणार नसेल तर मग त्यांचा उपयोग काय आणि ते काय कामाचे आहेत ? सध्या काही प्रमुख संघांचे कोच व मॅनेजर यांच्या कामगिरीकडे पाहिल्यास त्यांच्यातील उणीवाच अधिक दिसतात. जो खेळाडू दररोज सराव करायला येतो, ज्याच्या खेळात गुणवत्ता आहे अशांना डावलून जो अनियमित खेळतो, सराव करत नाही, त्यालाच संघात घेण्याची पद्धत कोच व मॅनेजरनी स्वीकारली गेली आहे. ज्या खेळाडूंकडे स्टॅमिना नाही अशा खेळाडूंकडून सामन्यात पराभव होताना गैरप्रकार होण्याची किंवा धोकादायक खेळ होण्याची शक्यता आहे. मग अशा नियमित सरावास नसलेल्या खेळाडूंना खेळविण्याचा अट्टाहास का धरला जातो, याचा कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. वास्तविक खेळाडूंना शिस्त शिकविण्याची जबाबदारी कोचची असते, पण तोच बेशिस्त वागायला लागला तर खेळाडूंवर तर नियंत्रण कसे राहणार आणि शिस्त तरी कशी लावणार ? खेळाडूंसोबत रात्रीचे एकत्र फिरणे, बसणे उठणे योग्य आहे का आणि शिस्तीच्या प्रकारात मोडते का, याचा कुठेतरी गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरील संघातील खेळाडू शिस्त पाळतातच ना ?


पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी ?
पोलीस हे समाजात शांतिदूत असतात. त्यांच्याकडून अपेक्षाही तशाच आहेत, परंतु फुटबॉलच्या मैदानावर बंदोबस्त देणे हे नवीन काम लागले आहे. या संधीचा फायदा घेत मैदानावर विना गणवेश पोलिसांची संख्या वाढली आहे. हे विना गणवेश पोलीस कोणत्या पोलीस ठाण्याचे आहेत. त्यांचे मैदानावर काय काम आहे. बरं सामना पाहायला आले असतील तर ते प्रेक्षक म्हणून फक्त सामनाच पाहून निघून जातो की अन्य कोणत्या गोष्टीत लक्ष घालून बसलेले असतात याचे परीक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्हायला पाहिजे. एका विशिष्ट संघाचे समर्थक असलेले विनागणवेश पोलीस अनेक फुटबॉल संघांची डोकेदुखी बनले आहेत. आपल्या संघाचा सामना असताना मैदानावर वाद झाला की हेच पोलीस प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांना दणकायला पुढे असतात. त्यावेळी ते ड्युटी करत असल्याचा आव आणतात आणि इतरवेळी ‘संघाचे समर्थक’ म्हणून वावरतात. परवाच्या राड्यात एक पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाला हे त्याचेच द्योतक आहे. सामना पाहायला येणाऱ्या पोलिसांनी सामना पाहूनच परत जावे. मैदानावर भेदभाव करू नये.



प्रायोजक येतील का ?
फुटबॉलला आता कुठे चांगले दिवस आले होते. संयोजक, प्रायोजक पुढे आले होते. खेळाडूंनाही सन्मान मिळत होता; परंतु कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा त्याच जुन्या मार्गावरून जायला लागला. खेळाडू, समर्थक, तालमीचे पदाधिकारी आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत. त्यामुळे आता संयोजक, प्रायोजक येतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर असे घडले, तर नुकसान सर्वांचेच आहे.

कारवाईला आता वर्ष
सोमवारी झालेल्या सामन्यामुळे अर्धे शहर वेठीला धरले गेले. अनेक वाहनांचे नुकसान झाले. काहीजण जखमीही झाले. आता या प्रकाराला आपण जबाबदार नाहीत, असे सांगून ‘केएसए’ आपली बाजू झटकण्याची शक्यता आहे पण या राड्याचा प्रकार मैदानावरून आणि एका खेळाडूच्या गैरवर्तनावरुन झाला आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे संबंधित संघावर तसेच खेळाडूवर कारवाई केलीच पाहिजे.


दोन पोलिसांमधील फरक
सोमवारी झालेल्या सामन्यानंतर समर्थकांत मोठी हाणामारी झाली. यात पोलीस कॉन्स्टेबल रोहित ठोंबरे आघाडीवर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात ठोंबरे याला पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी निलंबित केले परंतु त्याच राड्यावेळी महाद्वार चौकात बंदोबस्तास असलेले शहर वाहतूक शाखेचे हवालदार सर्जेराव केरबा पाटील यांनी पन्नास-साठ जणांचा जमाव जेव्हा एका कापड दुकानावर चाल करून गेला तेव्हा हातात काठी घेऊन जमावाला पांगविले.

फुटबॉल सामन्यातील हाणामारी पोलिसांमुळेच
गणी आजरेकर : सूडबुद्धीनेच आयोजकांवर कारवाई
कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी मुस्लिम बोर्डिंग फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली आहे. दोन्ही संघांत झालेल्या वादाला पोलीसच जबाबदार आहेत. याबाबत पोलीस महानिरीक्षकांना भेटून निवेदन देणार आहोत. या अन्यायाविरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी दिली.
आजरेकर म्हणाले, जुना राजवाडा पोलिसांना स्पर्धेच्या परवानगीचा अर्ज दिला होता. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही. मग थेट पोलीस प्रमुखांकडे स्पर्धेस बंदोबस्ताची मागणी करीत परवानगीचा अर्ज जुना राजवाडा पोलिसांनी स्वीकारलेला नसल्याची कल्पनासुद्धा दिली होती. दि. १५ एप्रिल रोजी रीतसर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या नावे अर्ज करून मुस्लिम बोर्डिंग फुटबॉल चषकासाठी परवानगी मागितली. त्यानंतर पुन्हा राजवाडा पोलिसांकडे कार्यालयीन कर्मचाऱ्याला पाठवून अर्ज स्वीकारण्याची विनंती केली. मात्र, तो अर्ज स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला व जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयास अर्ज देऊन परवानगी घेण्याबाबत सुचविले. त्यानुसार आम्ही कार्यवाही केली. हे पत्र पोलीस अधिक्षक कार्यालयामधून राजवाडा पोलिसांकडे आल्यानंतरही आम्हाला पुढील कार्यवाहीसाठी बोलाविले नाही. मग आम्ही स्पर्धेची परवानगी घेतली नाही, असे म्हणणे कितपत योग्य आहे ?
दुसरा मुद्दा म्हणजे, ज्या स्पर्धा बेकायदेशीरपणे भरविण्यात आल्या, त्या स्पर्धांमध्ये दस्तुरखुद्द पोलीस संघसुद्धा खेळविला गेला. मग स्पर्धा बेकायदेशीर ठरवून पोलिसांनी आयोजकांवर केलेली कारवाई योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. यावेळी प्रशासक कादरभाई मलबारी उपस्थित होते.

Web Title: The mistakes must be made in the 'Punch'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.