ऑनलाइन फ्रॉडसाठी बँक खात्यांचा गैरवापर, कानपूर पोलिसांच्या नोटिसांमुळे समोर आला प्रकार

By उद्धव गोडसे | Updated: January 31, 2025 19:10 IST2025-01-31T19:09:55+5:302025-01-31T19:10:47+5:30

कदमवाडीतील एजंटचा कारनामा

Misuse of bank accounts for online fraud in kolhapur, many youths trapped for five thousand | ऑनलाइन फ्रॉडसाठी बँक खात्यांचा गैरवापर, कानपूर पोलिसांच्या नोटिसांमुळे समोर आला प्रकार

ऑनलाइन फ्रॉडसाठी बँक खात्यांचा गैरवापर, कानपूर पोलिसांच्या नोटिसांमुळे समोर आला प्रकार

उद्धव गोडसे

कोल्हापूर : जिल्ह्यातील काही तरुणांना पाच हजार रुपये देऊन त्यांच्या बँक खात्यांवरून ऑनलाइन फसवणुकीचे व्यवहार झाले आहेत. याबाबत उत्तर प्रदेशातील सीसामाऊ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने संबंधित बँक खातेधारकांना नोटीस आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या नोटिसांमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापर करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन फसवणुकीसाठी बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यांचा वापर केला जात आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तरुणांना पाच हजार रुपये देऊन त्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये खाती उघडली आहेत. या खात्यांसाठी एजंटची साखळी सक्रिय असून, ते खाते उघडून देण्यासाठी २० ते २५ हजार रुपये घेतात. खाते उघडताना कागदपत्र असलेल्या व्यक्तीचा मोबाइल नंबर वापरला जात नाही. त्याऐवजी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या रॅकेटने दिलेले मोबाइल नंबर संबंधित बँक खात्यांशी जोडले जातात. त्यामुळे खातेदाराला त्याच्या खात्यावरील व्यवहारांची माहिती मिळत नाही.

गेल्या दोन वर्षांपासून अशा खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. याबाबत उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात सीसामाऊ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात कोल्हापुरातील एका तरुणाच्या बँक खात्याचा वापर झाला. जुलै २०२३ ते जून २०२४ या काळात त्याच्या खात्यावर रोज हजारो रुपये जमा झाले. ते पैसे त्या-त्या दिवशी ऑनलाइन पद्धतीने काढूनही घेण्यात आले आहेत. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी सीसामाऊ पोलिस ठाण्यात सात दिवसांत हजर होण्याची नोटीस मिळताच खातेदारांचे धाबे दणाणले आहेत.

कदमवाडीतील एजंटचा कारनामा

कदमवाडीतील एका एजंटने त्याच्या ३० ते ४० मित्रांची बँक खाती शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडली आहेत. त्यानेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दिले. १५ ते २० दिवसांत खाती बंद होतील, असेही त्याने सांगितले होते. मात्र, कानपूर पोलिसांची नोटीस येताच त्याने हात वर केल्याचे समजते.

मोठे रॅकेट सक्रिय

तरुणांच्या नावे बँक खाते उघडून त्यावरून फसवणुकीतील लाखो रुपयांचे व्यवहार करणारे मोठे रॅकेट देशात सक्रिय आहे. यातून रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. एजंटला ताब्यात घेऊन चौकशी केल्यास यातील साखळी उलगडण्याची शक्यता आहे.

  • बँकेने संशयित खाती गोठवली
  • बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खातेधारकांच्या घरी जाऊन पडताळणी
  • फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता

Web Title: Misuse of bank accounts for online fraud in kolhapur, many youths trapped for five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.