कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा गैरवापर, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:16 PM2022-11-19T13:16:19+5:302022-11-19T13:18:40+5:30
अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव (वय ५२, रा. पितळी गणपती शेजारी, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी काल, शुक्रवारी (दि. १८) रात्री याबाबत फिर्याद दिली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, तसेच परीक्षा विभागाच्या कामकाजाबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अज्ञाताने विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि परीक्षा विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केला आहे. जुलै २०२२ पासून हा प्रकार सुरू असून, अज्ञाताने परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो सोशल मीडियात व्हायरल केला.
विद्यापीठाची बदनामी आणि फसवणूक केल्याबद्दल परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी शुक्रवारी रात्री अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.