कोल्हापुरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:50 PM2021-09-27T15:50:31+5:302021-09-27T15:53:30+5:30
भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."
कोल्हापूर: "भारत बंदसोबत शेतकरी-कामगारांची लढाई संपलेली नाही, ती खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. आजच्या बंदला जनतेने मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने धन्यवाद देतो," असे मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा निमंत्रक माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी म्हटले आहे.
आजच्या बंदला कोल्हापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून जनतेने प्रतिसाद दिला. इस्पुर्ली, हळदी, बीड फाटा, बीडशेड, कळंबा, सांगरूळ फाटा, कुंभी कासारी, कळे, राधानगरी, आमजाई व्हरवडे, मुदाळ तिट्टा, मुरगूड, भोगावती व्यापार पेठ, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, हलकर्णी फाटा, शिरोली, हातकणंगले, बांबवडे, इचलकरंजी, कुरूंदवाड, जयसिंगपूर, सांगरूळ, उचगाव, रेंदाळ, शिरोळ, चंदगड आदी प्रमुख ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको करून बंद पाळण्यात आला.
भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."
उदय नारकर म्हणाले, "आजच्या बंदने मोदी आणि भाजप सरकारला शेतकरी कामगार एकजूट हाच खरा पर्याय आहे, या एकजुटीतूनच भाजपला सत्तेवरून दूर करणारी शक्ती उभी रहात आहे."
अतुल दिघे म्हणाले, "शेतकरी वाचला तरच लोकशाही वाचेल, आणि कामगार जगला तरच देश जगेल, हे आजच्या बंदने दाखवून दिले आहे."
जनता दलाचे रवी जाधव म्हणाले, "तीन काळे शेती कायदे आणि कामगारविरोधी चार संहिता रद्द होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल पिवडे म्हणाल्या, "या लढ्यात महिला आघाडीवर राहतील. त्या महागाई विरोधात सतत लढत राहतील.
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार, काँग्रेसचे गुलाबराव घोरपडे, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, प्रा. डी. एन. पाटील, सुटाचे कार्यवाह डॉ. टी. एस. पाटील, सीटूचे विवेक गोडसे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, मावळा युवक ग्रूपचे उमेश पोवार, बागल विद्यापीठाचे अशोकराव साळोखे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.
यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आयटकचे नेते दिलीप पोवार, किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शेकापचे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, सरदार पाटील, रिपब्लिकन पक्ष (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष दगडू भास्कर, जनता दलाचे राज्य चिटणीस शिवाजीराव परूळेकर, वसंतराव पाटील, सीटूचे चंद्रकांत यादव, माकपचे शंकर काटाळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, शेकाप महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरी पोवाड्यांनी झाली. प्रास्ताविक शेकापचे शहर चिटणीस बाबुराव कदम यांनी केले.आयटकचे बाळासाहेब बर्गे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संभाजीराव जगदाळे यांनी केले.