'आयजीएम'च्या बेजबाबदारपणाबद्दल आमदार आवाडेंकडून तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:17+5:302021-06-02T04:20:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील आॅक्सिजन गळतीसंदर्भात संबंधित कंपनीला कळवूनही दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील आॅक्सिजन गळतीसंदर्भात संबंधित कंपनीला कळवूनही दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी अचानकपणे रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळले. एकूणच या बेजबाबदारपणाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यातील आयजीएम रुग्णालय हे मोठे शासकीय रुग्णालय आहे. तेथे सर्व सुविधा असतानाही त्याचा नियोजनबद्ध वापर होताना दिसत नाही. रुग्णालयातील सहा हजार लिटर क्षमतेच्या लिक्विड आॅक्सिजन प्लांटला गळती आहे. याबाबत संबंधित कंपनीला कळवूनही दुर्लक्ष होत आहे. नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटनेचा धडा घेवून तरी तातडीने ही दुरूस्ती व्हावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.
रुग्णालयातील खराब झालेले व्हेंटिलेटर दुरूस्त करण्याचे काम कल्लाप्पाण्णा आवाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ते कार्यान्वित झाले असून, व्हेंटिलेटरचा वापर कसा करावा, यासंदर्भात पुणे येथील संजय शिरवळ हे तीन महिने रुग्णालयात प्रशिक्षण देणार आहेत. मंगळवारी दिलेल्या भेटीमध्ये ४० ते ४५ आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आले. विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मशिन गरज म्हणून दिले असताना त्याचा उपयोग केला जात नाही.
फक्त कोविड रुग्णांना पुन्हा आॅक्सिजनची गरज भासल्यास रुग्णालयातील ३१ बेड आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून कार्यान्वित केले जाणार आहेत. त्याठिकाणी गरजेनुसार रुग्णांना आॅक्सिजन दिला जाणार आहे. त्याचबरोबर त्यासोबत एनआयव्ही मशिन एकमेकांस जोडून विनापाईप रुग्णांना आॅक्सिजन देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. यावेळी नगरसेवक सुनील पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, विजय पाटील, फरीद मुजावर उपस्थित होते.
फोटो ओळी
०१०६२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयास भेट देवून आमदार प्रकाश आवाडे यांनी माहिती घेतली.