छत्रपतींंच्या नामफलकावरून आमदार आवाडे यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:46 AM2021-02-28T04:46:39+5:302021-02-28T04:46:39+5:30

इचलकरंजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक, इचलकरंजी अशा नामकरणाचा फलक काढल्याने आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह शिवप्रेमींनी मुुख्य ...

MLA Awade's sit-in agitation from Chhatrapati's nameplate | छत्रपतींंच्या नामफलकावरून आमदार आवाडे यांचे ठिय्या आंदोलन

छत्रपतींंच्या नामफलकावरून आमदार आवाडे यांचे ठिय्या आंदोलन

Next

इचलकरंजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक, इचलकरंजी अशा नामकरणाचा फलक काढल्याने आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह शिवप्रेमींनी मुुख्य बसस्थानकात शनिवारी ठिय्या मारला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तामुळे बसस्थानक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार आवाडे यांनी परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधला असता २ मार्च रोजी मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याने तासभर सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. शिवजयंतीदिवशी काहींनी इचलकरंजीतील मुख्य बसस्थानकावर छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक असा फलक लावला होता. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी बसस्थानकात भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि नामकरणाचा फलक काढू नये. नामकरणासाठी आवश्यक तो प्रस्ताव द्यावा, त्याला शासनाकडून मंजुरी आणण्याचे आश्‍वासनही दिले होते. मात्र, तो फलक काढल्याने शनिवारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने बसस्थानक परिसरात जमले. याची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे दाखल झाले आणि नामकरण फलकाची पार्श्‍वभूमी विषद करून फलक का काढला, असा सवाल उपस्थित केला. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार आवाडे यांनी बसस्थानक प्रमुख सुवर्णा वड्डे यांना बोलविण्याची मागणी केली.

वड्डे यांनीही आवाडे यांच्याशी झालेली चर्चा मान्य करत नामकरणास परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे आवाडे यांनी नामकरणाचा फलक लावेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. पोलीस आणि बसस्थानक व्यवस्थापनाने आवाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवाडे यांनी परिवहन राज्य मंत्र्यांशी संपर्क साधून पार्श्‍वभूमी सांगितली. त्यांनी २ मार्च रोजी संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने सुमारे तासभर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, राजू बोंद्रे, पुंडलिक जाधव, दीपक सुर्वे, संजय जाधव, मोहन मालवणकर, संतोष सावंत, शेखर शहा, भारत बोगार्डे यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते.

Web Title: MLA Awade's sit-in agitation from Chhatrapati's nameplate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.