पाच राज्यांसोबतच कोल्हापूर 'उत्तर'चीही पोटनिवडणूक शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:24 AM2022-01-11T11:24:25+5:302022-01-11T11:29:20+5:30
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : उत्तरप्रदेश, गोव्यासह पाच राज्यातील निवडणुकीसोबतच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून त्याबाबत सोमवारी जिल्हा निवडणूक शाखेकडे विचारणा करण्यात आली आणि ही निवडणूक पाच राज्यांतील निवडणुकीसोबतच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हा निवडणुकीचा कार्यक्रम आज-उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
आमदार जाधव यांचे १ डिसेंबर २०२१ ला निधन झाले. ही जागा रिक्त झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने महाराष्ट्र विधिमंडळास व त्यांच्याकडून ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कळवण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सोमवारी जिल्हा निवडणूक शाखेकडे त्याबद्दल चौकशी करून निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी त्यास दुजोरा दिला.
काँग्रेसने आमदार जाधव यांच्या पत्नी व माजी नगरसेविका जयश्री जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसचे आवाहन आहे. आमदार जाधव हे मूळचे भाजपचेच होते. या कुटुंबाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आजही अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे भाजप निवडणूक लढवणार नाही असा मतप्रवाह आहे; परंतु राज्य पातळीवर मात्र ही निवडणूक लढवावी असाच आग्रह आहे.
कोल्हापुरात तोंडावरच महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहावे. मूळ पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्यास ही संधी दिली जावी. त्यामध्ये यश-अपयश न पाहता निवडणूक लढवावी व २०२४ ला ही जागा जिंकायचीच अशी तयारी करावी असे त्यांचे नियोजन आहे.
जयश्री जाधव सक्रिय
जयश्री जाधव यांनी विधानसभा निवडणूक लढवायची तयारी म्हणून सार्वजनिक जीवनातील वावर सोमवारपासून वाढवला. दिवंगत आमदार जाधव यांच्या संपर्क कार्यालयात इ-श्रम कार्डाची नोंदणी मोफत सुरु केली असून त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप सदस्यत्वाचा राजीनामा
आमदार जाधव यांना जेव्हा काँग्रेसची उमेदवारी मिळाली त्याचदिवशी जयश्री जाधव यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि नगरसेवकपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. जयश्री जाधव या अजून आमच्याच कार्यकर्त्या आहेत असे भाजप सांगत असल्याने त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल
आमदार चंद्रकांत जाधव (काँग्रेस) - ९१,५०३
राजेश क्षीरसागर (शिवसेना) - ७५,८५४
सतीशचंद्र कांबळे (भाकप) - १४८३
राहूल राजहंस (वंचित आघाडी) - ११५४