...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी

By संदीप आडनाईक | Published: April 14, 2023 08:02 AM2023-04-14T08:02:46+5:302023-04-14T08:07:37+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला.

mla dadasaheb shirke makes order of a government holiday on Dr Ambedkar Jayanti | ...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी

...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी

googlenewsNext

कोल्हापूर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सरकारने ‘१४ एप्रिल’ ही तारीख आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली.

कोल्हापुरातील सिद्धार्थनगर येथे वास्तव्य असलेले दादासाहेब शिर्के यांचा जन्म १९०७ मध्ये झाला, तर २६ डिसेंबर १९८५ रोजी मृत्यू झाला. शिर्के हे १९५७ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाकडून हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले होते. डॉ. आंबेडकर यांनीच त्यांना या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शिर्के यांनीच आंबेडकर जयंतीसाठी शासकीय स्तरावर सार्वजनिक सुट्टीचा पहिला ठराव विधानसभेत मांडला. विधिमंडळात १९५८ ते १९६१ या काळात संघर्ष करून शिर्के यांनी शासकीय सुट्टीचा ठराव मंजूर करवून घेतला. विरोधी पक्षाचे सभासद या नात्याने मताधिक्य नसतानाही हा ठराव पास करून घेण्यात दादासाहेबांनी आपले संघटना चातुर्य आणि संसदपटूत्व पणाला लावले.

दादासाहेब शिर्केंचा सरकारने केला सन्मान 
शिर्के यांना २२ जून १९७६ रोजी राज्य सरकारने मानपत्र दिले होते. त्यात याचा उल्लेख आहे.

आंबेडकरांच्या स्मृती जपल्या घरात
वयाच्या १४ व्या वर्षी दादासाहेब शिर्के आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट सिद्धार्थनगरातील चिंचेच्या झाडाखाली निपाणीचे बी. एच. वराळे यांनी घडवून आणली. शिर्के यांच्या सिद्धार्थनगरातील घरी 
डॉ. आंबेडकर मुक्कामी असायचे. आजही ही ऐतिहासिक वास्तू शिर्के परिवाराने जपली असून, 
डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी आणि त्यांच्या वापरातील काही वस्तूही जपून ठेवल्या आहेत.

Web Title: mla dadasaheb shirke makes order of a government holiday on Dr Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.