आमदार वाढले, पक्ष गटबाजीत गुरफटला

By admin | Published: May 26, 2016 12:10 AM2016-05-26T00:10:32+5:302016-05-26T00:21:24+5:30

शिवसेनेतील दुफळी न मिटणारी : कडव्या कार्यकर्त्याला नेहमीच बगल--पक्षांचा ‘राज’रंग शिवसेना

The MLA grew, the party struggled with gambling | आमदार वाढले, पक्ष गटबाजीत गुरफटला

आमदार वाढले, पक्ष गटबाजीत गुरफटला

Next

कोल्हापूर जिल्ह्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश दिले. जिल्ह्यातील दहापैकी या पक्षाचे तब्बल सहा आमदार निवडून आले. आमदारांची संख्या वाढली, त्या तुलनेत पक्ष मजबूत झाल्याचे चित्र नाही. उलट नेत्यांतील गटबाजीमुळे संघटनेत दुफळी आहे. आमदारांना एकत्रित सोबत घेऊन पक्ष पुढे नेऊ शकेल असे सर्वमान्य नेतृत्व नाही. पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा जसा हाडाचा कार्यकर्ता होता, तसे कडवे शिवसैनिक ही पक्षाची जमेची बाजू आहे; परंतु त्या शिदोरीवर पक्षाचा प्रभाव विस्तारत नाही म्हणून नेतृत्वाने कायमच उसन्या नेत्यांची आयात केली आहे. ते मुळच्या शिवसेनेशी, कार्यकर्त्यांशी एकजीव होत नाहीत. त्याचा परिणाम पक्षाच्या वाढीवर होत असल्याचा अनुभव अनेक वर्षापासून येत आहे.


गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रचंड हवा झाली व त्याचा परिणाम म्हणून या पक्षाला आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीतील सर्वोत्तम यश मिळाले, परंतु या यशाचा खोलात जाऊन धांडोळा घेतल्यास ते खरेच शिवसेनेचे यश आहे की त्या त्या उमेदवारांना तत्कालीन परिस्थितीत लागलेली लॉटरी आहे याचा उलगडा होतो. तसा विचार केल्यास सहापैकी राजेश क्षीरसागर व डॉ. सुजित मिणचेकर हेच शिवसेनेचे मूळचे कार्यकर्ते, ज्यांना कडवे सैनिक म्हणता येईल. बाकीचे चारजण हे त्या त्या परिस्थितीत त्या मतदारसंघात नेतृत्वाची पोकळी तयार झाल्यावर व पक्षाचे पाठबळ हवे म्हणून शिवसेनेच्या आश्रयाला गेले. त्यामुळे उमेदवारांची ताकद व त्याला शिवसेनेच्या आक्रमकपणाची जोड मिळाल्यावर त्यांना विजय मिळून गेला.
शिवसेनेच्या ताकदीचा, पक्ष प्रभावाचा त्यांना फायदा झाला, परंतु त्यांच्यामुळे पक्ष वाढल्याचा किंवा त्यासाठी त्यांनी मुद्दाम प्रयत्न केल्याचे दिसत नाही. साधे उदाहरणच घ्यायचे झाल्यास कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जे काही राबले ते आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार हेच. अन्य कुणी आमदारांने शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा म्हणून कुठे सभा घेतली नाही की त्याला चार पैशाची मदत केली नाही. आमदार नरके जिथे राहतात तिथे महापालिकेला शिवसेनेचा कोण कार्यकर्ता लढतो आहे याची साधी चौकशीही त्यांनी केली असेल असे वाटत नाही. एक संघटित ताकद म्हणून पक्ष या निवडणूकीला सामोरे गेला नाही. तसे तो जाणारही नाही कारण तसे झाले आणि शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले तर त्याचा फायदा क्षीरसागर यांना मिळू शकेल. त्यांचे पक्षातील वजन वाढेल असेही त्यामागील कारण होते. आताही पक्षात राज्यमंत्रीपदासाठी क्षीरसागर व नरके यांच्यात छुपा संघर्ष आहे. लोकसभा निवडणूकीतील या दोघांचा ‘परफॉर्मन्स’ हा निकष लागल्याने ते प्रलंबित पडले आहे. या पदासाठी अधूनमधून आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचेही नांव चर्चेत येते.
भूमिका म्हणूनही पक्षात कमालीची दुफळी असल्याचे चित्र दिसते. मुळचे शिवसैनिक असलेले जिल्हाप्रमुख व त्याखालील संघटना विविध प्रश्र्नांवर आंदोलन करून चर्चेत राहते. कांहीवेळा आंदोलनही इतकी होतात की त्यांतील कांहीमध्ये नेत्यांच्या हेतूबध्दलही लोक शंका घेतात. दुसरे असे की, राज्यातील सत्तेचा शिवसेना घटक आहे. प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले आणि पुन्हा सर्वांत जास्त आंदोलने शिवसेनेकडूनच होतात याचेही गौडबंगाल समजत नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे, संघर्ष करणे यांत गैर काहीच नाही. परंतु इथे सत्ता भोगतात ते एकाबाजूला आणि आंदोलन करणारे दुसऱ्या बाजूला अशा सरळ दोन फळ््याच तयार झाल्या आहेत.
आमदार क्षीरसागर व संजय पवार यांच्यातील शीतयुद्ध जगजाहीरच आहे. त्याचा फटका पक्षाला महापालिका निवडणुकीतही बसला आहे. क्षीरसागर यांनी निवडलेले दोन्ही शहराध्यक्ष आता संजय पवार यांच्या सोबत आहेत, परंतु बहुतांशी शहर कार्यकारिणी आमदारांसोबत आहे. आंदोलन असो की कार्यक्रम या दोघांमुळे शहरात शिवसेना कायम चर्चेत राहते हे मात्र नाकारता येत नाही. विजय देवणे व मुरलीधर जाधव यांच्याकडे काही मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यातील देवणे गावोगावी फिरताना दिसतात. त्यांनी व संजय घाटगे यांनी प्रयत्न केल्यामुळे गडहिंग्लज कारखान्यांत चांगली लढत दिली व आता आजरा कारखान्यांत सत्तेत वाटा मिळाला. दुसरे असेही एक चित्र दिसते की जिथे आमदार आहेत, तिथे संघटनेला विश्वासात घेतले जात नाही. म्हणजे मूळचा शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्यास आमदारांच्या गोतावळ््यात स्थान नाही. आमदार हे तालुक्याच्या राजकारणात स्वत:चा गट म्हणून राजकारण करतात. नरके यांची मतदारसंघावर पकड असली तरी त्यांनाही सोयीनुसार काँग्रेसची सावली लागते. आमदार प्रकाश आबिटकर यांचेही तसेच आहे. उल्हास पाटील यांची जडणघडण स्वाभिमानी संघटनेत झाल्यामुळे त्यांचे काँग्रेसवाल्यांशी लागेबांधे नव्हते. सत्यजित पाटील यांचेही तालुक्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादीत नामधारी असलेल्या मानसिंगराव गायकवाड यांच्याशी गट्टी आहे. सत्यजित आबा आता मानसिंगराव यांच्या मुलग्यास जिल्हापरिषदेत निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
पक्षाने गेल्या लोकसभा निवडणूकीत मागच्या तीन-चार वेळा केला तसाच प्रयोग केला व संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. मंडलिक यांच्याकडे स्वत:चे लाख-दीड लाख मतांचे पॉकेट आहे. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांची पुण्याई व कारखानदारीचे पाठबळ यामुळे ते निवडून येतील, असे गणित होते; परंतु तसे घडले नाही. त्यासही अंतर्गत गटबाजीच कारणीभूत आहे. लोकसभेला पराभूत झाल्यावर संजय मंडलिक यांना पक्षाने सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली; परंतु त्यांचा प्रत्यक्षातील अनुभव ‘सह’ही नाही व ‘संपर्क’ही नाही असा येत आहे. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी राजकीय तडजोड केल्यामुळे त्यांचीही भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. लोकसभेला ते शिवसेनेचेच उमेदवार असतील असे ठामपणे आज सांगता येत नाही.
कोल्हापूरने शिवसेनेला चांगले यश दिले हे सत्य असले तरी ते अर्धसत्य आहे. हे राजकीय यश आहे. लोकांनी शिवसेनेचा उजवा विचार स्वीकारल्याचे ते द्योतक नाही; कारण कोल्हापूरची राजकीय जडणघडण डाव्या पुरोगामी विचारांनी झालेली आहे. तो मोठा प्रभाव लोकांवर अजूनही आहे. त्यामुळेच विधानसभेनंतर अन्य निवडणुकीत शिवसेनेला पक्ष म्हणून चांगले यश मिळालेले नाही, हीच खरी या पक्षाची दुखरी नस आहे.
विश्वास पाटील : (उद्याच्या अंकात : शेकाप, स्वाभिमानी, जनसुराज्यसह इतर सर्व)

Web Title: The MLA grew, the party struggled with gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.