हसन मुश्रीफ यांची भूमिका ही त्यांची ‘अगतिकता’; सहा महिने चौकशीने हैराण
By राजाराम लोंढे | Published: July 3, 2023 12:55 PM2023-07-03T12:55:10+5:302023-07-03T12:55:35+5:30
..त्यामुळे ते पवार यांची साथ सोडतील असे वाटतच नव्हते.
कोल्हापूर : कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करण्यामागे त्यांची अगतिकता आहे. ‘ब्रिक्स’ कंपनी, जिल्हा बँकेच्या मागे गेली सहा महिने ईडीचा ससेमिरा लावला होता. न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी ते कमालीचे हैराण होते.
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आमदार अशीच संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांच्यात संघर्ष उफाळला त्यावेळी पवार यांनी मुश्रीफ यांना साथ व ताकद दिली. एवढ्यावरच पवार थांबले नाहीतर मुश्रीफ यांच्या सारख्या अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याला पाच वेळा आमदार आणि अठरा वर्षे मंत्रिपद दिले. हे खुद्द मुश्रीफ यांनीच जाहीर सभांमधून सांगितले आहे.
अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथवेळी ते शरद पवार यांच्यासोबतच ठाम राहिले. ते पवार हे आपले बाप असल्याचे जाहीरपणे सांगत होते. त्यामुळे ते पवार यांची साथ सोडतील, असे वाटतच नव्हते. पवार यांचे पश्चिम महाराष्ट्रातील निष्ठावंत आमदारांमध्ये मुश्रीफ यांचे स्थान वरचे होते.
गडहिंग्लज साखर कारखाना त्यांनी ‘ब्रिक्स’ कंपनीस चालवण्यास दिला. या कंपनीसह जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेला कर्जपुरवठा व संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनियमतेबाबत ईडीकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यासह नातेवाइकांच्या घरांवर, जिल्हा बँकेच्या शाखांवर ईडीने छापे टाकले होते.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावल्याने ते अस्वस्थ होते. त्यांना घेरण्याचे काम भाजपने केेल्याने भाजपसोबत जाण्याखेरीज त्यांच्याकडे काहीच पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे मुश्रीफ यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची अगतिकताच होती, असे मानले जाते.
‘ते’ फोटो आता सन्मानाने
कागल मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या हसन मुश्रीफ यांच्या जाहिरातीमध्ये शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. याबाबत, गैरसमज करू नये, असा खुलासा त्यांनी केला होता. मात्र, थोड्याच दिवसात हेच समीकरण उदयास आल्याने आता ते फोटो सन्मानाने लावण्यास हरकत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.