आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 06:35 PM2022-05-11T18:35:04+5:302022-05-11T18:36:14+5:30
पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती.
जयश्री जाधव यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित कदम लढले होते. निवडणूक भाजप व महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते झाडून सहभागी झाले होते. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला होता.
शपथविधीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम टोपे, विधानभवनचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.