आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
By भारत चव्हाण | Published: May 19, 2024 05:16 PM2024-05-19T17:16:57+5:302024-05-19T17:17:19+5:30
उपचारासाठी मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरांना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलविण्यात आले आहे.
कोल्हापूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने रविवारी सकाळी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कमी रक्तदाबाचा त्रास सुरु होता. रविवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये तोल जाऊन ते पडले. त्यांच्या हाताला तसेच डोक्याला मार लागल्यानंतर त्यांना तातडीने एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार कार्यात सक्रिय राहिलेल्या आमदार पी. एन. पाटील यांना निवडणूक झाल्यानंतर कमी रक्तदाबाचा त्रास सुरु झाला होता. दोन दिवसापूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काहीही दोष आढळला नाही. त्यामुळे ते उपचारानंतर घरीच विश्रांती घेत होते. रविवारी सकाळी ते बाथरुममध्ये असताना यांच्या हाताला व डोकीला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलविण्यात आले आहे.
आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळताच शाहू छत्रपती, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संजय डी. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भोगावती तसेच करवीर मतदार संघातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेत विचारपूस केली.