Kolhapur: राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघात आबिटकरांचा हॅट्ट्रिकसाठी 'खेळ'; मेव्हण्या-पाहुण्यांचा जमेना 'मेळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:06 PM2024-10-22T12:06:12+5:302024-10-22T12:07:11+5:30
महाविकासच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच : सतेज यांची भूमिकाही महत्त्वाची
शिवाजी सावंत
गारगोटी : राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघात हॅट्ट्रिक करण्यासाठी सरसावलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीतून अनेकजण इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार के.पी पाटील, ए. वाय. पाटील हे मेव्हणे पावणे तसेच राहुल देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील प्रयत्न करीत आहेत. मनसेतून युवराज येडुरे पुन्हा एकदा रेल्वे इंजिन घेऊन जनतेसमोर जात आहेत. महविकास आघाडी उमेदवारी कुणाला मिळते यावरच येथील गणिते अवलंबून असतील.
गत निवडणुकीत आठ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यावेळी हे सगळे इच्छुक सावध झाले आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. शिंदेसेनेतून आबिटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
या मतदारसंघात गत दोन्ही निवडणुकींत शिवसेनेतून आमदार आबिटकर हे विजयी झाले. त्यामुळे आघाडी धर्मानुसार ही जागा उद्धवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई हे तिकिटासाठी जोडण्या लावत आहेत. महाविकास आघाडीत उमेदवारी देताना आमदार सतेज पाटील यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार निश्चित झाला नसल्याने इच्छुकांसह मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणाला उमेदवारी मिळणार त्यावर पुढचे राजकारण अवलंबून आहे. एकास एक उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची धडपड सुरू आहे; परंतु इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही असा पवित्रा घेतल्याने त्यांना थांबविताना वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी होणार आहे.
उपरा आणि उसना
या मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार नको अशी निष्ठावंतांची मागणी जोर धरत असल्याने ऐनवेळी बिघाडी होण्याची शक्यता आहे.
ए. वाय., देसाई यांच्या जोर बैठका
के. पी. पाटील यांच्यामुळे उमेदवारी मिळण्यात गेल्या दहा वर्षांत अडसर निर्माण होत आहे. हे जाणून लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ए वाय पाटील हे काँगेसमध्ये सामील झाले. राहुल देसाई हेदेखील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत सामील झाले. कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही, असे ठरवून या दोघांनी तयारी सुरू केली आहे.
२०१९ चा निकाल
- प्रकाश आबिटकर १,०५,८८१
- के. पी. पाटील ८७,४५१
- मताधिक्य..१८,४३०
सध्याचे मतदान
- एकूण ३,४०,९७८
- पुरुष..१,७५,८३७
- महिला..१,६५,१२९
- इतर..१२