प्रकाश आबिटकर मागे फिरा, अन्यथा...; संपर्कप्रमुख अरुण दुधवडकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:13 PM2022-06-27T18:13:56+5:302022-06-27T18:14:37+5:30
आबिटकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बंडखोरीमुळे सामान्य शिवसैनिकांची प्रतिक्रिया वाईट आहे.
आजरा : आमदार प्रकाश आबिटकर तुम्ही मागे फिरा, खुल्या मनाने स्वीकारू. पण बंडखोरी केल्यास सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेनाकोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला. ते आजऱ्यात शिवसैनिकांच्या भेटीवेळी बोलत होते.
बंडखोरी केलेले आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. गुवाहाटीतही शिवसैनिक आहेत. आमदार प्रकाश आबीटकर यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी सांगावे. आम्ही त्यांना संरक्षणात तेथून आणू. आबीटकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आम्ही त्यांचे बंधू जिल्हा बँक संचालक अर्जुन आबीटकर यांचेकडे चौकशी केली. तोपर्यंत व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. आबिटकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बंडखोरीमुळे सामान्य शिवसैनिकांची प्रतिक्रिया वाईट आहे.
उद्धव ठाकरेंचे मन मोठे
पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे. तुम्ही परत या. आमदार ही शिवसेनेची ताकद नसून सामान्य शिवसैनिक हीच खरी ताकद आहे. आर्थिक व्यवहार व ईडीची भीती दाखवून आमदारांना भाजपने बंडखोरी करायला लावली आहे असाही आरोप अरुण दुधवडकर यांनी केला.
क्षीरसागर-इंगवले संघर्ष वैयक्तिक
कोल्हापुरातील माजी आमदार राजेश क्षीरसागर व शहर प्रमुख रवी इंगवले यांच्यातील संघर्ष हा वैयक्तिक आहे असेही अरुण दुधवडकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख युवराज पोवार, उप तालुका प्रमुख संजय येसादे, शहरप्रमुख ओंकार माद्याळकर, युवा सेना अधिकारी महेश पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, रोहन गिरी उपस्थित होते.