Kolhapur: आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार; सुरेश हाळवणकरांकडून हिरवा कंदील, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 03:22 PM2024-09-25T15:22:53+5:302024-09-25T15:26:04+5:30
..तर आवाडे यांची भूमिका काय असेल ?
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा गुंता सुटताना दिसत आहे. आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे पितापुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाला पाच वर्षापासून रोखून धरणाऱ्या माजी आमदार सरेश हाळवणकरांनीही आता हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आवडे यांच्या प्रवेशाची बातमी शहरात पसरताच हाळवणकर समर्थकांनी हाळवणकर यांच्या कार्यालयात गर्दी केली.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हाळवणकर म्हणाले, आवाडे आणि माझ्यातील वैचारिक मतभेद हे सर्वश्रृत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार आवाडे यांनी भाजपाला पाठींबा दिला. पाच वर्षांत आवाडे यांनी भाजपा प्रवेशासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने पक्ष वाढीसाठी नेतृत्वाने बेरजेचे धोरण स्वीकारले आहे. त्याला आम्ही मान्यता दिली आहे.
उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही
मात्र कोणाचीही उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही. तो अधिकार फक्त पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे. उद्याला पक्षाने जर माझी उमेदवारी जाहीर केली. तर आवाडे यांची भूमिका काय असेल असा प्रतिसवाल करत, आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांची मानसिकता आजही आवाडे यांना भाजपात घेण्याची नाही. ही माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय होईल, असे सांगितले.