महाडिक भ्याले, म्हणून तर ते रडीचा डाव खेळले; सतेज पाटील यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:48 AM2023-03-30T11:48:02+5:302023-03-30T11:58:47+5:30
कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखी लढा
कसबा बावडा : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत विरोधी गटाचे २९ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविले. दबावाच्या राजकारणातून त्यांनी हा निर्णय घेतला. खरंतर सहकारातला हा काळा दिवस म्हणावा लागेल. महाडिक भ्यालेत म्हणून त्यांनी हा रडीचा डाव खेळला. त्यांनी लांग घातली होती तर सरळ कुस्ती खेळायची होती. महाडिकांनी थेट मैदानात उतरायचे होते, बावड्याचा पाटील कधीही मागे पडणार नाही, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे दिले.
विरोधी गटाचे प्रमुख उमेदवार अपात्र ठरल्यानंतर त्यांनी अजिंक्यतारा येथे सभासदांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, बाबासाहेब चौगले, सुनील मोदी आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याबाबत लोकांत जाऊन निवडणूक जिंकू शकत नाही हे समजल्याने महाडिकांकडून रडीचा डाव खेळण्यास सुरुवात झाली. हिंमत असेल तर लढा. सभासदांना निर्णय घेऊ दे. कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखी लढा. छाननीत २९ अर्ज जरी बाद झाले असले तरी इतर सर्वच गटांत आपले अर्ज शिल्लक आहेत. त्यामुळे भिण्याचे कारण नाही. पॅनेल पूर्ण क्षमतेने होणार आहे. कोणत्याही गटाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आता आपणास ताकतीने लढवायची आहे.
आता पाठ सोडणार नाही..
चांगलं केलं..तुम्ही रडीचा डाव खेळला..मी राजाराम कारखान्यासाठी १४ तास राबणार होतो..आता २४ तास राबणार आहे. आता झोपणार नाही.. कुठल्या गावांत गेलो तर तिथेच वळकट घेऊन झोपणार, सकाळी उठून कामाला लागणार, परंतु तुमची पाठ सोडणार नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यावर सभासदांनी टाळ्या-शिट्यांचा गजर केला.
उच्च न्यायालयात जाणार
अपात्र ठरविलेल्या २९ उमेदवारांच्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सगळेच संपलेले नाही. न्यायदेवता बसलेली आहे. तेथे सत्याचा विजय होईल. येथे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निर्णय घेतला असला तरी न्यायालयात शंभर टक्के आपल्या बाजूने न्याय होईल, तुम्ही काळजी करू नका. लढ्याची तयारी करा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
एक्का माझ्याकडे.....
सतेज पाटील म्हणाले, पत्ता त्यांनी टाकलाय मात्र डाव आम्हीच जिंकणार कारण त्यांनी जोकर टाकलाय, पण १२ हजार सभासद हा एक्का माझ्याकडे आहे. ही लढाई महाडिक आणि बंटी पाटील अशी नाही.. तर कोल्हापूरचे १२ हजार सभासद विरुद्ध येलूरचे ६०० सभासद अशी आहे. ही निवडणूक काहीही झाले तरी जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराचा नारळ फोडणार...
प्रत्येक गटात आपले उमेदवार आहेत, त्यामुळे कोणीही भिण्याचे कारण नाही. निवडणूक ताकतीने लढवायची आहे. येत्या शुक्रवार, शनिवारी प्रचाराचा नारळ फोडायचा आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच सभासदांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.