गोकुळ मल्टिस्टेटचा वाद : संघाच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:38 PM2019-10-30T12:38:00+5:302019-10-30T12:43:04+5:30

कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) विशेष सभेत बुधवारी जोरदार गोंधळ झाला.

MLA Satej Patil-Dhananjay Mahadik Khadajangi | गोकुळ मल्टिस्टेटचा वाद : संघाच्या सभेत गोंधळ

गोकुळ मल्टिस्टेटचा वाद : संघाच्या सभेत गोंधळ

Next
ठळक मुद्दे गोकुळ मल्टिस्टेटचा वाद : संघाच्या सभेत गोंधळ आमदार सतेज पाटील-धनंजय महाडिक खडाजंगी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) विशेष सभेत बुधवारी जोरदार गोंधळ झाला.

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न होता परंतू विधानसभा निवडणूकीनंतर सत्ताधारी गटानेच तो निर्णय मागे घेतला. परंतू या मुद्द्यावरून विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील व सत्तारुढ गटाचे समर्थक माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात वृत्तवाहिनीवरील चर्चेत जोरदार खडाजंगी झाली.

पराभवाने महाडिक संपतील अशी कुणी समजू नये, तुमचाही यापूर्वी २०१४ ला पराभव झाला होता असा टोला महाडिक यांनी लगावला. तर गोकुळच्या वाटचालीशी महाडिक यांचा काडीचा संबंध नाही, तुमचा संबंध फक्त तिथे भाड्याने टँकर लावण्यापुरता असून संघाच्या उभारणीचे श्रेय महाडिक यांनी घेवू नये. येत्या निवडणूकीत गोकुळमध्ये दूध उत्पादक नक्की सत्तांतर घडविणार आहेत हे माहित झाल्यानेच सत्ताधाऱ्यांनी संघाच्या सभेत गोंधळ घातल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

आमदार सतेज पाटील म्हणाले,‘सभेपूर्वीच मल्टिस्टेटचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने मागे घेतला असल्याने आम्हांला सभेत गोंधळ घालण्याचे कारण नव्हते. उलट सत्ताधाऱ्यांनीच आपले बगलबच्चे खोट्या पासवर नेवून सभेत पुढील बाजूस बसविले होते. तेच गोंधळ घालत होते. हिंमत असेल तर या सभेचे चित्रीकरण पहावे व कुणाचे लोक गोंधळ घालत आहेत हे त्यावरून ठरवावे. गोकुळ हातात राहील की नाही या भितीपोटीच सत्ताधारी लोकांनी सभेत गोंधळ घातला.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले,‘ गोकुळ हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवरील चांगला चाललेला दूध संघ आहे. संघाने मल्टिस्टेटचा निर्णय मागे घेतला असतानाही विरोधकांनी राजकीय द्वेषातून संघाच्या सभेत गोंधळ घातला. मल्टिस्टेटचा निर्णय आम्हीच मागे घेतला असताना सभेत आम्हांला गोंधळ घालण्याचे कारणच नाही. विरोधक चुकीची माहिती देवून लोकांची दिशाभूल करत आहेत.’

मल्टिस्टेटचा नेमका वाद काय..

संघावर गेली पंचवीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. परंतू गेल्या निवडणूकीत त्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार विरोध केला. आमदार पाटील गटाचे दोन संचालक निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तारुढ गटाला पाठिंबा दिला होता. परंतू आता ते आमदार पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संघाची सत्ता आपल्याकडे राहणार नाही हे लक्षात आल्यावर सत्तारुढ गटाने संघाची नोंदणी मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला.

संघ मल्टिस्टेट झाल्यास नव्याने सभासद करून संस्थेची सत्ता आपल्याच कब्ज्यात ठेवणे शक्य होते. परंतू त्यास कोल्हापूरच्या जनेतने कडाडून विरोध केला. या मुद्दावरून लोकसभा निवडणूकीत महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

आता विधानसभा निवडणूकीतही त्यांचा मुलगा अमल महाडिक यांचा पराभव झाला. या मुद्दावरून संघाची सत्ता हातातून जावू शकते हे लक्षात आल्याने दोन दिवसांपूर्वीच संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी एक निवेदन प्रसिध्दीस देवून मल्टिस्टेटचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. निर्णय मागे घेतला तरी संघाचे राजकारण यावरून पुढे पेटणार आहे. त्याचीच झलक बुधवारी झालेल्या विशेष सभेत पाहायला मिळाली.
 

Web Title: MLA Satej Patil-Dhananjay Mahadik Khadajangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.