कोल्हापूर जिल्हा परिषदेतील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित, जिल्ह्यातील आमदारांचे मौन पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:04 IST2025-03-05T12:04:30+5:302025-03-05T12:04:42+5:30
कोल्हापूर : सरपंच हत्या प्रकरण मोठ्या धाडसाने लावून धरल्याने संपूर्ण राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचलेले आमदार सुरेश धस यांनी कोल्हापूर जिल्हा ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित, जिल्ह्यातील आमदारांचे मौन पण..
कोल्हापूर : सरपंच हत्या प्रकरण मोठ्या धाडसाने लावून धरल्याने संपूर्ण राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचलेले आमदार सुरेश धस यांनी कोल्हापूरजिल्हा परिषदेतील लाचखोरीवर चालू अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारले आहेत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरील स्वीय सहायक आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शिपायाने घेतलेल्या लाच प्रकरणाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. आमदार धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाशी संंबंधित माहिती घेऊन दोन्ही विभागातील अधिकारी मुंबईला गेले आहेत.
जिल्हा परिषद वित्त विभागात फंड मॉनिटरिंग सिस्टीमचे अधिकाऱ्याचे लॉगिन आयडी वापरून स्वीय सहायक हा कक्षासमोरच ठेकेदारांकडून पैसे गोळा करीत होता. ‘लोकमत’ने ठेकेदारांकडून पैसे घेतानाच स्वीय सहायकाच्या फोटाेसह २१ मार्च २०२४ रोजी बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची उचलबांगडी केली. त्यासंबंधीचा प्रश्न आमदार धस यांनी विचारला आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच ११ जुलै २०२४ ला पैसे घेतल्याचे प्रकरण उघड झाले. अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शिपायाने विकासकामांची निविदा मंजूर करून देण्यासाठी ठेकेदारांकडून १० हजार रुपये घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात गेल्याचे व्हिडिओ क्लिप समोर आली. त्याची चौकशी झाली आहे का? संबंधितावर कोणती कारवाई केली? असा दुसरा प्रश्न आमदार धस यांनी विचारला आहे. या दोन्ही प्रकरणाच्या मलईचे कनेक्शन अधिकाऱ्यांपर्यंत असल्याने पैसे घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही. आता आमदार धस यांनी याकडे विधानसभेत तारांकित केल्याने कारवाई होणार का? यासंबंधीची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्ह्यातील आमदारांचे मौन पण..
जिल्हा परिषदेतील दोन्ही लाचखोरीची प्रकरणे प्रसिद्धी माध्यमातून ठळकपणे चव्हाट्यावर आली. त्याची दखल घेऊन बीड जिल्ह्यातील आमदार धस यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला. पण, यावर जिल्ह्यातील एकाही आमदारांनी आवाज उठवला नाही, हे विशेष आहे. दोन्ही प्रकरणे महायुतीच्या सरकारमधील आहेत. महायुतीचेच भाजपचे आमदार धस यांनी प्रश्न विचारल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.