खोची बंधाऱ्याच्या नादुरुस्तीची आमदारांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:08+5:302021-04-16T04:23:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : खोची येथील वारणा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करा. सातत्याने या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : खोची येथील वारणा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करा. सातत्याने या बंधाऱ्याच्या बाबतीत लक्ष ठेवून प्रवाशांची काळजी घ्या. दुरुस्तीच्या प्रस्तावासाठी अडचण येत असेल तर तत्काळ सांगा. मंत्रालयात पाठपुरावा करून सहकार्य करू, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
काल लोकमतने ‘खोची बंधारा दगड निसटून खचतोय’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी माहिती दिली. याची दखल घेत आमदार राजू आवळे यांनी आज खोची-दुधगाव बंधाऱ्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खोची, दुधगावचे ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते. तसेच बंधाऱ्याच्या बाजूलाच संथपणे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आमदार आवळे यांनी कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ठेकेदाराची मनमानी चालू देणार नाही.लोकांची प्रचंड गैरसोय सोय होत आहे. मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. काम गतीने सुरू ठेवून पुलाचे काम पूर्ण करा, असे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
यावेळी पाटबंधारे विभागाच्या अभियंता नेहा देसाई म्हणाल्या, बंधारा दुरुस्तीचा सुमारे सव्वा तीन कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यावर काम सुरू करण्यात येईल. तसेच या ठिकाणाहून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी आठवडाभरात केली जाईल.
प्रधान मंत्री सडक योजनेचे अभियंता के .डी. मुधाळे म्हणाले, दुधगावकडील भराव व खोचीकडील स्लॅबचे काम व भूसंपादनचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पुढच्या आठवड्यात भूसंपादनाच्या बाबतीत निर्माण झालेला प्रश्न शेतकरी, ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा करून सोडवू.
यावेळी खोची सरपंच जगदीश पाटील, दुधगाव सरपंच विकास कदम, अमरसिंह पाटील, एम. के. चव्हाण, भैरवनाथ पोवार, हणमंत पाटील, शंकर जांभळे, डॉ.अनिल पाटील, अभिजीत चव्हाण, वैभव पाटील, नानासो इंगळे, महावीर मडके, इलाइ देसाई उपस्थित होते.
फोटो ओळी- खोची दुधगाव बंधाऱ्याच्या नादुरुस्तीची पाहणी आमदार राजू आवळे यांनी केली. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी जगदीश पाटील, अमरसिंह पाटील, नेहा देसाई, अनिल पाटील, एम. के. चव्हाण उपस्थित होते.