‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:47 PM2018-08-13T12:47:14+5:302018-08-13T12:50:00+5:30
तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.
कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने दि. १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे दि. २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली.
विमानसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दि. २९ जुलैपासून पुन्हा या कंपनीकडून ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू राहिली. मात्र, रविवारी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली.
या विमानातून मुंबईहून कोल्हापूरकडे आमदार डॉ. सुजित मिणचेकर येणार होते, तर कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईला जाणार होते. पण, विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना ऐनवेळी वाहनाने प्रवास करावा लागला. विमानफेरी रद्दबाबतच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान याबाबत ‘एअर डेक्कन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी या कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
मुंबईतून कोल्हापूरला जाणारी फ्लाईट फुल्ल होती. हवामानही चांगले होते, तरीही एअर डेक्कन कंपनीने विमानफेरी रद्द केली. त्याची पूर्वकल्पना दिली नाही. विमानतळावर गेल्यानंतर फेरी रद्द केल्याचे समजले. ऐनवेळी विमानफेरी रद्द करणे चुकीचे आहे. याबद्दल या कंपनीच्या मुंबईतील व्यवस्थापकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.
- आमदार डॉ. सुजित मिणचेकर
विमानफेरी रद्द झाल्याची माहिती दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. ती आधी मिळाली असती, तर मुंबईला जाण्यासाठी सकाळी लवकर निघता आले असते. अचानक फेरी रद्द करणे प्रवाशांची गैरसोय करणारे आहे. कंपनीने नियमित सेवा देणे आवश्यक आहे.
- आमदार राजेश क्षीरसागर