कोल्हापूर: किणी टोल नाक्यावर मनसे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वातावरण तणावपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:13 PM2022-09-19T17:13:10+5:302022-09-19T17:13:58+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार होते.
किणी : मुदत संपून सुद्धा सुरु असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मोडून काढले. आंदोलकांची धरपकड केल्याने टोलनाका परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले होते.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार होते. दुपारी दीड वाजण्याचा सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावर दोन लक्झरी बसने पुरुष व महिला कार्यकर्ते दाखल झाले.
मनसेचा विजय असो, बंद करा बंद करा टोल वसुली बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शासनाच्या व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकरांचा निषेध नोंदविण्यासाठी तिरडी मोर्चासाठी आणलेली तिरडी व मडके पोलिसांनी काढून घेतले. तर टोलनाक्यापासून काही अंतरावरच जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना पोलिसांनी बळाचा वापर करत उचलुन नेऊन पोलीस व्हॅनमध्ये घातले. महिला, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पेठवडगाव पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. अचानक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
परवानगी घेऊन सुद्धा पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढले असून इथून पुढे लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले. आंदोलनामध्ये प्रविण माने, नागेश चौगुले, नयन गायकवाड, फिरोज मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचे नेतृत्वाखाली जलद कृती दलाच्या तीन तुकड्यासह जयसिंगपूर, हातकणंगले, पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे टोलनाक्यावर पोलीस छावणीची प्राप्त झाली होते