‘मनसे’ नेत्यांसमोरच वर्चस्ववाद : बैठक ‘रद्द’ची नामुष्की-राजू दिंडोर्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:52 AM2018-03-27T00:52:34+5:302018-03-27T00:52:34+5:30
कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला.
कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला. वादामुळे कार्यकर्त्यांची बैठक रद्द करण्याची नामुष्की नेत्यांवर आल्याने नांदगावकर चांगलेच सतप्त झाले. ‘शिस्त पाळायची नसेल तर तुम्हाला रस्ते मोकळे आहेत’, अशा शब्दांत त्यांनी दोघांना सुनावले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने संपूर्ण महाराष्टÑात संपर्क मोहीम राबविली आहे. माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर व अविनाश अभ्यंकर यांच्यावर पश्चिम महाराष्टÑाची जबाबदारी दिली आहे. शिरोळ, इचकरंजी, हातकणंगले मतदारसंघांचा दौरा करून नांदगावकर सोमवारी कोल्हापूर शहरात आले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती.
शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व राजू जाधव यांनी आपापल्या समर्थकांसह रॅली काढली. रॅली शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जाधव व दिंडोर्ले यांनी शक्तिप्रदर्शन करताना एकमेकांवर कुरघोड्या केल्याने वादाची ठिणगी पडली. नेत्यांसमोरच दोन्ही समर्थकांमध्ये अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने नांदगावकर भडकले. दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने नांदगावकर व अभ्यंकर चांगलेच भडकले. शिस्त पाळणार नसाल, तर तुमचे मार्ग मोकळे आहेत, अशा शब्दांत त्यांनी तराटणी दिली. त्यानंतर बैठक रद्द करून थेट पत्रकार परिषद घेतली.
यामध्येच त्यांनी झालेला प्रकार सांगून त्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका, अशी विनंती पत्रकारांना केली.
कार्यकर्ते कळेनात म्हणून बैठक रद्द!
येथील कार्यकर्त्यांपैकी कितीजण आमचे आणि किती दुसऱ्याचे हे कळेना. त्यामुळे कुटुंबात एखादी गोष्ट विश्वासाने बोलायची कशी, म्हणून बैठकच रद्द केली. आगामी काळात सदस्य नोंदणी करून मगच बैठक घेऊ, असे नांदगावकर यांनी सांगितले.
दुर्लक्ष झाल्याची कबुली
पक्षाच्या स्थापनेवेळी कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला; पण आमच्याकडूनच येथे दुर्लक्ष झाले. कार्यकर्त्यांना पाठबळ देऊ शकलो नाही, त्यामुळेच असे प्रकार होत असल्याची कबुली देत यापुढे दोन्ही ‘राजू’ ‘मनसे’मध्ये मनाने काम करतील, असा विश्वास नांदगावकर यांनी व्यक्त केला.
विश्रामगृहावर तणाव
जाधव व दिंडोर्ले समर्थक मोठ्या प्रमाणात होते. दोघांमधील वादानंतर विश्रामगृहावरील वातावरण चांगलेच तापले. पत्रकार परिषदेला राजू जाधव यांनी येण्यास नकार दिला. नांदगावकर यांनी चार-पाच निरोप दिल्यानंतर जाधव आले; पण त्यांच्या चेहºयावर तणाव दिसत होता.