कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 06:20 PM2020-09-24T18:20:24+5:302020-09-24T20:19:23+5:30
महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
अमृत पाईपलाइन योजनेचे ११५ कोटी रुपयांचे काम महापालिकेच्या वतीने दास या खासगी कंपनीला काम दिले आहे. सुरुवातीपासूनच योजना वादग्रस्त ठरली आहे. अनेक वेळा महासभा, स्थायी समिती सभांमध्येही ठेकेदारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
पावसाळ्यापूर्वी या कंपनीने कोल्हापुरात काम सुरू केले, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंचनामा करण्यात आला. ज्या पद्धतीने कामाचे टेंडर भरण्यात आले, त्या पद्धतीने काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामाला स्थगिती द्यावी व कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मनसेकडून महापालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला.
काही दिवसांत याचा खुलासा झाला नाही तर महापालिकेला टाळे ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, राजू बागवान, कृष्णात दिंडे, राज मकानदार, बबन सावरे, अमित फराकटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका प्रवेशद्वाराजवळ रुखवत
या आंदोलनात वरातीत रुखवत म्हणून वाळू, खडी, सिमेंट, माती हे ठेवण्यात आले होते. हे सर्व महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून पाइर्पलाइर्नच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनामुळे मोठे लग्नसमारंभ व वरातीला बंदी असली तरी कोल्हापुरात वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत घोड्यावरून वरात निघाली. यानिमित्ताने बँडबाजाचालकांना तब्बल सहा महिन्यांनंतर कामही मिळाले.