"मोबाईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 02:42 PM2019-01-19T14:42:26+5:302019-01-19T14:43:06+5:30

गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज तरूण पिढी दोन ते तीन तास मोबाईलच्या वापरात व्यस्त असल्याने इप्सित ध्येयापासून दूर जात आहे.

"Mobile" | "मोबाईल"

"मोबाईल"

Next

- डॉ. दत्ता कोहिनकर
रविवारचा दिवस - केशकर्तनालयात गेलो होतो. तेथे रेडिओवर एक गाणे लागलेले होते- मेरे पिया गये रंगून-वहाँ से किया है टेलिफोन-तुम्हारी याद सताती है । बाजूला पाहिले तर प्रतिक्षेत असलेले तीन-चार जण मोबाईलमध्ये गुंग झाल्याचे दिसले. परवाच सागर पावसात भिजत कामावर आला पण मोबाईल मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीत मागच्या खिशात असा ठेवून दिला होता, की पाण्याचा एकही थेंब त्याला लागता कामा नये. स्वतः रेनकोट वापरत नव्हता पण मोबाईलला मात्र पूर्णतः सुरक्षित ठेवत होता. खरंच या सहा इंच लांबीच्या व 3 इंच रूंदीच्या या मोबाईलमध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे.

फक्त बोलणेच नाही तर गाणी, रेडिओ, कॅमेरा, घड्याळ, इमेल, ईबुक सगळेच या छोट्या डबीत तुम्हाला केव्हाही उपलब्ध असते. घरात बसून सगळ्या जगाशी तुम्हाला संपर्क साधणे यामुळ सहजसाध्य झाले आहे.पूर्वी मुलीला माहेरहून सासरी जाण्यासाठी एस.टी.त बसवताना आई-बाप म्हणायचे, पोहोचली की लगेच पत्र पाठव. आता मिस कॉल दे असं सांगतात. बरेच जण मिस कॉल आला की काय ते सहजपणे आपापल्या सोयीनुसार समजून घेतात. पुर्वी प्रेमपत्र मैत्रिणीला पोचवण्यासाठी लहान मुलाला चॉकलेटचे अमिष दाखवून चिठ्ठी पोहचवावी लागे. आता त्वरित मनातलं सगळं (मन की बात) सहजपणे मोबाईलद्वारे सांगता येते. मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून आपण आपले उत्पादन किंवा स्वतः विषयीची माहिती लाखो लोकांपर्यंत पोहचवु शकतो. ई-बुकवर पुस्तके वाचू शकतो पाहिजे ते फोटो घेण्यासाठी त्याचा वापर करता येतो. स्वीय सहायक म्हणूनही मोबाईलचा वापर करता येतो. एकदा रात्रीच्या वेळी एक रिक्षा घाटातून सरळ दरीत कोसळली. मागच्या कारमधील व्यक्तीने मोबाईलवरून 100 नंबरला कळवले. क्षणार्धात फायर बि‘गेड, डॉक्टर, अ‍ॅम्युलन्स, पोलीसयंत्रणा उभी राहिली. तीन जीव वाचले. एक मोबाईलचा कॉल-तीन जीव वाचवण्यास कारणीभूत ठरला. कुठेही ईप्सित स्थळी जाताना रस्ता, दिशा दाखवण्यासाठी देखील मोबाईलचा उपयोग होतो. पण याच मोबाईलचा आज अतिवापर होत असल्याचे दिसून येतेय. डोळ्यांवर दुष्परीणाम, कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेत घट, एकलकोंडेपणा, वेळेचा अपव्यय अशा अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. या मोबाईलच्या अतिवापरामुळे इअर टयुमरचा धोका वाढतो व मेंदूची कार्यक्षमता घटते. तसेच डीएनएला देखील नुकसान पोहचू शकते. अश्‍लील क्लीप्स्, चित्रे सहज उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी कामुक होवून चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. महागडा मोबाईल खरेदी करण्यासाठी विद्यार्थी वाममार्गाचा वापर करू लागले आहेत. गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज तरूण पिढी दोन ते तीन तास मोबाईलच्या वापरात व्यस्त असल्याने इप्सित ध्येयापासून दूर जात आहे. सारखी मान खाली वाकल्याने मानेचा आजार, मणक्याचा आजार बळावत आहे. भावना काबूत ठेवता न आल्याने भांडणतंटा वाढू लागला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत. व्याभिचाराला प्रोत्साहन मिळू लागले आहे. लोक मोबाईल व्यसनात, लहान मुले गेम खेळण्याच्या व्यसनात अडकली आहेत. मोबाईलवर सारखा गेम खेळतो म्हणून वडीलांनी मोबाईल हिसकावून घेतल्याने 12 वर्षाच्या मुलाने पुण्यात आत्महत्या केली आहे. मोेबाईलच्या अतिवापरामुळे ताण वाढत असल्याने डिप्रेशनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कड्यावर-दर्‍याखोर्‍यात सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जण आपला जीव गमावत आहेत.

प्रक्षुब्ध पोस्ट टाकल्याने सामाजिक तणाव वाढत आहेत. मुली तर आता एकमेकींना लाडाने स्वीचऑफ, डिलीट, मिस कॉल, फॉरमॅट अशा नावांनी हाका मारतात. एक दिवस मोबाईल घरी विसरला तरी माणसे अस्वस्थ होत आहेत. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि तोटा हा असतोच. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या वाक्याप्रमाणे *मोबाईलचा अतिवापर करण्यापेक्षा पाहिजे तेव्हाच, हवा तेवढा वापर केला तर मोबाईल एक वरदान असेल. अन्यथा शाप* !

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत)

Web Title: "Mobile"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.