मोबाईल बॅटरीचा खिशात स्फोट; तरुण जखमी, सीपीआर चौकातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:51 AM2019-12-31T11:51:21+5:302019-12-31T11:57:56+5:30
दुचाकीवरून ‘सीपीआर’मध्ये येत असताना खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. सुदैवाने त्याची बहीण व चुलतभाऊ जखमी झाले नाहीत. प्रफुल्ल याला मारहाण झाली होती. उपचारासाठी त्याला दुचाकीवरून घेऊन येत असताना सोमवारी दुपारी सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर आल्यानंतर ही घटना घडली.
कोल्हापूर : दुचाकीवरून ‘सीपीआर’मध्ये येत असताना खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. सुदैवाने त्याची बहीण व चुलतभाऊ जखमी झाले नाहीत. प्रफुल्ल याला मारहाण झाली होती. उपचारासाठी त्याला दुचाकीवरून घेऊन येत असताना सोमवारी दुपारी सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर आल्यानंतर ही घटना घडली.
जखमी प्रफुल्ल कांबळे हा खासगी कंपनीत नोकरी करतो. घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्याच्या कुटुंबीयास घरकुल योजनेतून घर बांधणीस अनुदान मिळाल्याने घर बांधण्यास काढले आहे. सोमवारी दुपारी जागेच्या वादातून शेजाऱ्यांबरोबर वादावादी होऊन त्याला मारहाण झाली. डोक्यात दुखापत झाल्याने त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यासाठी चुलतभाऊ व बहीण वैशाली दुचाकीवरून येत होते.
सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर येताच प्रफुल्लच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला. मोठा आवाज होऊन आग व धूर बाहेर येऊन प्रफुल्ल खाली कोसळला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी त्याला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बॅटरीच्या स्फोटामुळे त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान सीपीआर पोलीस चौकीत मारहाणीत जखमी झाल्याची नोंद आहे. मोबाईल स्फोटाची नोंद नाही. स्फोट कशामुळे झाला. मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे. चायनिज मोबाईल आहे का? याबाबत चर्चा ‘सीपीआर’मध्ये होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.