मोबाईल व्यावसायिकास ७० हजारांचा आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:53 AM2019-02-25T10:53:09+5:302019-02-25T10:54:29+5:30
कोल्हापूर : बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर ...
कोल्हापूर : बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेत मोबाईल व्यावसायिकास हॅकर्सने सुमारे ७० हजार रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला.
अधिक माहिती अशी, शाहिद महंमद ढोले (वय २८, रा. दुधाळी पॅव्हेलियनजवळ, कोल्हापूर) यांची मोबाईल शॉपी आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी ढोले यांच्या मोबाईलवर फोन आला. मी बजाज फायनान्स मधून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून त्यांची बँक खात्याची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर ढोले यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला.
काही वेळातच त्यांच्या कावळा नाका येथील एस बँकेच्या खात्यातून ७० हजार रुपये परस्पर काढल्याचा मॅसेज आला. ढोले यांनी आलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद असल्याचे दिसून आले.
हॅकर्सनी आपल्या बँक खात्यावरून परस्पर आॅनलाईन पैसे काढल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २३) फिर्याद दिली.