मोबाईल-- बाल स्वास्थ
By admin | Published: February 7, 2017 11:11 PM2017-02-07T23:11:59+5:302017-02-07T23:11:59+5:30
मुलांमध्ये मोबाईलचा वापर सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही.
गेल्या दोन भागामध्ये आपण मोबाईलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम पाहिले. आज हे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करता येईल ते पाहुया. तसेच मोबाईलचा वापर मुलांच्या आरोग्याच्या चांगल्या कारणासाठी करता येईल का? याचाही विचार करूया.
लहान मुले व मोठी माणसे यांची शरीररचना भिन्न असते. या वाढीच्या वयात मुलांचे अवयव वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये असतात. मुलांना त्यांच्या अपेक्षित आयुर्मानानुसार मोबाईलचा वापर दीर्घकाळ करावा लागणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये मोबाईलचा वापर सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही. तोपर्यंत मोबाईलचा वापर टाळता येणे शक्य असल्यास टाळला पाहिजे किंवा वापर सिमित केला पाहिजे. मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर ही खेळणी नव्हेत याचे भान मुले व पालक या दोघांनीही ठेवणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या दूसंचार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ वर्षांखालील मुलांमध्ये मोबाईलचा वापर करणे अयोग्य आहे. अनेक शाळांमध्ये मोबाईल आणण्यावर घातलेली बंदी योग्यच आहे. घरी असताना मोबाईल किती वेळ आपल्या मुलांना हाताळू द्यायचा याचा विचार पालकांनी केला पाहिजे. मोबाईल ऐवजी लॅँडलाईन फोनचा वापर जास्तीत जास्त व्हावा. मोबाईलवर बोलणे अपरिहार्य असल्यास तो शरीरापासून लांब ठेवला जावा. एकाच कानाने मोबाईल ऐकणे टाळावे, दीर्घकाळ बोलणे टाळावे, रात्री अंधरात जास्त मोबाईल पाहणे टाळावे. व्हिडिओ गेम ऐवजी मैदानी खेळावर, इतर छंदावर वेळ खर्च करावा. कधीतरी व्हिडिओ गेम बघावेसे वाटल्यास टीव्हीसारख्या इतर माध्यमांचा वापर करावा.
मोबाईलचा बाल आरोग्यासाठी काही चांगला वापर करून घेता येईल का? गेल्या महिन्यात तीन-चार पालकांनी माझ्याकडे येऊन त्यांच्या बाळाच्या लसीकरणाबाबत त्यांच्या मोबाईलवर आलेला संदेश मला दाखविला. अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने नुकतेच एक मोबाईल अॅप तयार केले आहे. त्यावर पालकांनी आपल्या मुलाचे नाव व जन्मतारीख रजिस्टर केल्यास त्यांना त्यांच्या मुलाच्या वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत नियोजित लसीकरणाच्या तारखेस अगोदर कुठली लस कधी देणे आवश्यक आहे, याचा संदेश मिळू शकतो. अशाच प्रकारचा विधायक वापर पल्स पोलिओसारख्या मोहिमेमध्ये संपर्काचे महत्त्वाचे साधन म्हणून करता येईल. त्यामुळे लसीकरणाची व्यापकता आणखी वाढविता येईल. काही शहरांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून मुलांचे मौखिक आरोग्य सुधारण्यासाठी व दातांच्या समस्या टाळण्यासाठी आरोग्य शिक्षण यशस्वीपणे देण्यात आले आहे. क्षयरोग, एच. आय.व्ही. यांसारख्या आजारांमध्ये औषधोपचार हा नियमितपणे आणि दीर्घकाळ घ्यावा लागतो. औषधोपचारामधील अनियमितपणामुळे आजारात गुंतागुंत निर्माण होते. अशावेळी मोबाईलच्या माध्यमातून आरोग्य केंद्रे सातत्याने रुग्णांच्या संपर्कात राहिल्यास रुग्ण बरे होण्यास नक्की मदत होऊ शकेल. गरोदर मातेच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी तसेच औषधोपचार आणि आपत्कालीन मदत यासाठीही मातेला मोबईलच्या माध्यमातून नियमित संवाद साधण्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये वंचित शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाकरिता मोबाईलचा वापर स्थानिक स्वयंसेवकामार्फत करून घेता येईल. युवा वर्गाच्या सबलीकरणासाठी तंत्रज्ञान व माहितेचे साधन म्हणून मोबाईल वापरता येऊ शकतो.
शेवटी कोणतेही नवीन तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखेच असते. त्याचा योग्य वापर करणे आपल्याच हातात असते. - डॉ. मोहन पाटील-(लेखक हे नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.)