मोबाईलच्या स्फोटाने मुलाचा डोळा निकामी--: गेम खेळत असताना स्फोट होऊन पार्टचा तुकडा घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:35 AM2019-06-01T00:35:09+5:302019-06-01T00:36:43+5:30
मोबाईलवर गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन त्यामधील पार्टचा एक तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने उंदरवाडी (ता. कागल) येथील एका मुलाचा डावा डोळा निकामी झाला
सरवडे : मोबाईलवर गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन त्यामधील पार्टचा एक तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने उंदरवाडी (ता. कागल) येथील एका मुलाचा डावा डोळा निकामी झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. अमोल दत्तात्रय पाटील (वय १६) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, उंदरवाडी गावातील अमोल पाटील याने सरवडे येथील खोराटे विद्यालयातून १० वीची परीक्षा दिली आहे. तो हुशार असल्याने अमोलला घरातील मंडळींनी जादा क्लाससाठी के. पी. पाटील शैक्षणिक संकुलात दाखल केले आहे. बुधवारी घरातील सर्व माणसे भैरीचे पठार येथे शेतीच्या कामासाठी गेली होती. सकाळी १० वा.च्या सुमारास अमोलने जनावारांना वैरण घातली आणि घराच्या उंबऱ्यावर मोबाईलवर गेम खेळत बसला. थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. त्या मोबाईलमधील पार्टचा एक धातूचा तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला. वेदना सुरूझाल्याने शेजारील लोकांनी त्याच्या वडिलांना कळविले.
शेतातून वडील आल्यावर अमोलला कोल्हापूर येथील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील नेत्ररोग तज्ज्ञांनी तत्काळ शस्रक्रिया केली व तो तुकडा काढला; पण त्या डोळ्याने त्याला दिसणे बंद झाले आहे. हुशार असलेल्या अमोलचा मोबाईलमुळे डावा डोळा निकामी झाला असून मानसिक, शारीरिक व शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे त्या मोबाईल कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे वडील दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.
मोबाईलचा स्फोट झाल्याने त्यातील लोखंडी पत्र्याचा पार्ट जोराने डाव्या डोळ्याच्या खालच्या पापणीतून घुसून डोळ्याच्या मुख्य नसेपर्यत पोहोचला. ही नस कट झाल्यामुळे त्या डोळ्याने दिसणे बंद
झाले आहे.
डॉ. सुजाता नवरे, आधार हॉस्पिटल, कोल्हापूर