कळंबा कारागृहातील सुरक्षा रामभरोसे; पुन्हा सापडला मोबाइल, सुरक्षारक्षकांना शोध लागेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:28 PM2023-04-24T12:28:54+5:302023-04-24T12:29:38+5:30
अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक चारच्या १३ आणि १४ क्रमांकाच्या कोठडीमागे असलेल्या ड्रेनेजमध्ये सिमकार्ड नसलेला मोबाइल आणि चार्जर वायर सापडली. रविवारी (दि. २३) सकाळी घेतलेल्या झडतीत ही कारवाई करण्यात आली. कारागृहात मोबाइल आणणाऱ्या कैद्याचा मात्र सुरक्षारक्षकांना शोध लागला नाही.
कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कारागृहातील सर्कल क्रमांक चारची विशेष झडती मोहीम सुरू होती. यावेळी सुरक्षारक्षक राजेंद्र गव्हाणे यांना १३ आणि १४ क्रमांकाच्या कोठडीमागे ड्रेनेजमध्ये दुधाच्या पिशवीच्या कागदात काळ्या चिकटटेपमध्ये गुंडाळलेला मोबाइल सापडला. यात चार्जरची वायरही होती. सिमकार्ड नसलेला मोबाइल आणि चार्जरची वायर तुरुंगाधिकाऱ्यांनी जप्त केली.
याबाबत कोठडीतील कैद्यांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, कारागृहात मोबाइल कोणी आणला, याचा शोध लावण्यात तुरुंगाधिकाऱ्यांना यश आले नाही. तुरुंगाधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील (वय ५०, रा. कळंबा, सरकारी अधिकारी निवासस्थान) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.