कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आढळला मोबाइल, सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 06:29 PM2023-01-02T18:29:00+5:302023-01-02T18:29:18+5:30
कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी कैद्यांच्या झाडाझडती दरम्यान तुरुंगांच्या भिंतीत दुधाच्या पिशव्यात लपवलेला सीम कार्ड आणि बॅटरी ...
कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी कैद्यांच्या झाडाझडती दरम्यान तुरुंगांच्या भिंतीत दुधाच्या पिशव्यात लपवलेला सीम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल आढळला.
या प्रकरणामुळे या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंग अधिकारी श्रेणी क्रमांक दोनचे भारत उत्तरेश्वर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. भारत पाटील हे शनिवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक तीन, चार आणि पाच येथे कर्तव्य बजावत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते सर्कल क्रमांक तीनमधील बराक क्रमांक दोनमध्ये झाडाझडती घेत होते.
यावेळी त्यांना बराकीच्या आत जाण्याच्या भिंतीमध्ये एक दुधाची पिशवी आढळून आली. त्यांनी ती बाहेर काढली असता त्यामध्ये निळ्या रंगाचा सीम कार्ड व बॅटरी नसलेला मोबाईल आढळला. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात कारागृह कायदा १८९४ चे कलम ४२, ४५ (१२) व भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.