‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ पुन्हा सुरु
By admin | Published: May 25, 2014 12:57 AM2014-05-25T00:57:43+5:302014-05-25T01:12:51+5:30
थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न काढला निकाली
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग ’ ही विशेष हेल्पलाईन मोहीम आता पुन्हा नव्या जोमाने महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. हेल्पलाईनच्या थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न पोलीस प्रशासनाने निकाली काढला असून सोमवारपासून हे पथक पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या आंबटशौकीनांसह गुंडांना आता चांगलाच चाप बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ ८६०५४००५५५ ही विशेष हेल्पलाईन मोहीम गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. हेल्पलाईनवरून करण्यात आलेल्या कॉलचे बिल भरमसाठ आल्याने ते कोणी भरायचे? हा पेच पोलीस प्रशासनापुढे उभा राहिला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तातडीने थकीत बिलाचा प्रश्न निकाली काढीत ही हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हेल्पलाईनवर संपर्क साधताच ‘हॅलो, नमस्कार, जयहिंद, महिला पोलीस कॉन्स्टेबल... बोलतेय, बोला...’ असा आवाज ऐकू येणार आहे. (प्रतिनिधी) सचिवांच्या ‘डोस’ने पदाधिकारी भानावर कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार व जिल्हाप्रमुख यांच्यातील चिखलफेक शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या कडक ‘डोस’मुळे थांबली. यामुळे सर्वजण चांगलेच भानावर येऊन हे पेल्यातील वादळ शमल्याचे सकृतदर्शनी चित्र आहे. असे असले तरी या ‘डोस’चा अंमल किती दिवस राहतो हे आगामी काळातच स्पष्ट होईल. शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव शिवसैनिकांना जिव्हारी लागला. यातून आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाक्युद्ध रंगले. एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करून उणीदुणी काढण्याचे काम जाहीर चिंतनाच्या नावाखाली घेतलेल्या मेळाव्यातून झाले. ज्यांचा पराभव झाला त्या प्रा. मंडलिकांनी या पराभवाबाबत कुणाच्याही विरोधात चकार शब्द काढला नाही. मात्र, इथले पदाधिकारी एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसत होते. याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले दूत म्हणून शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांना गुरुवारी कोल्हापूरला पाठविले. त्यांनी सर्वच टीकाकारांना पक्षाच्या चौकटीत रहा, आपल्या मर्यादा ओळखा, हे सर्व आता थांबवा; अन्यथा आम्ही थांबवू, असा कडक डोस दिला. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या द्वंद्वयुद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्हीकडील वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. खा. देसाई यांच्या ‘डोस’मुळे सर्वजण चांगलेच भानावर आले आहेत. चिखलफेक थांबल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे नेहमीच गटबाजीतून होणारी चिखलफेक सद्य:स्थितीला थांबली असली तरी ती कायमची थांबणार का? अशी साशंकताही व्यक्त होत आहे. एकमेकांवर झालेल्या टीकेबाबत विचारणा केली असता आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी हा विषय शिवसेना सचिवांसमोरच संपला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)