कोल्हापुरात चोरलेले मोबाईल थेट जातात दिल्ली, कर्नाटकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:59+5:302021-09-06T04:28:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लहान मुलांचा वापर करुन शहरातून रोज शंभरहून अधिक मोबाईल संच चोरीला जात असल्याची धक्कादायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लहान मुलांचा वापर करुन शहरातून रोज शंभरहून अधिक मोबाईल संच चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. आठवडा बाजारसह, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीला जात आहेत. मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर करणारी टोळी सदर बाजारातून दोघेजण चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कोल्हापूरात चोरलेले मोबाईल आठवड्यात थेट दिल्ली, हवेरीला (कर्नाटक) पाठवले जातात, त्यामुळे तो पुन्हा परत मिळण्याच्या घटना दुर्मिळच.
भाजी खरेदीसाठी जाताना सावधान! असे म्हणण्याची वेळ आली. शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतिर्थ, रेल्वे स्टेशन, गंगावेश (शाहू उद्यान), टिंबर मार्केट या भाजी मार्केटसह लक्ष्मीपुरीतील कोंबडी बाजार, महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपूरीतून रोज मोबाईल चोरीच्या घटना घडतात. मोबाईल चोरीसाठी शहरात १५ ते २० लहान मुलांची टोळी सक्रीय असून वस्तू घेण्यासाठी ग्राहक वाकल्यानंतर त्याच्या खिशातून मोबाईल चोरला जातो. मुलांवर चोरीच्या संशयाचा प्रश्नच येत नाही. आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या मोठ्या घटना घडताहेत. महाद्वार रोडवर महिला भीक मागतात, सोबतची मुले पर्स, पाकीट चोरत असल्याचे पोलिसांच्या सीसी टिव्हीमध्ये निदर्शनास आले. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यत चोरटे डाव साधून जागा बदलतात.
‘अविनाश, राजा’ टोळीचालक
सदर बाजार परिसरातून अविनाश आणि राजा नामक दोघे मोबाईल चोरट्या मुलांची टोळी चालवतात. चोरलेले मोबाईल रात्री त्यांच्याकडे आणून देतात, त्यांचा नाममात्र मोबदला मुलांना मिळतो. काही वर्षे हा चोरीछुपा प्रकार सुरु असूनही पोलिसांना थांगपत्ता नसल्याबाबत सांशकता आहे. मुलांना मोबाईल चोरीचे प्रशिक्षण दिले जाते. चोरी प्रकरणात दोघा म्होरक्यांची नावे पुढे आल्यास त्यांना पोलीस बोलवून त्यांची ‘फक्त’ चौकशी करतात.
आठवड्याला पोत्याने मोबाईल दिल्ली, हवेरीत
सदर बाजार येथून दर आठवड्याला किमान दिड ते दोन हजार मोबाईल पोत्यात भरुन दिल्ली अथवा कारवार व हवेरी (कनार्टक) येथे पाठवले जातात. अगर ते नेण्यासाठी तेथून खास व्यक्ती कोल्हापूरात येऊन मोबाईल घेऊन जाते.
बिहारची टोळी आली, मिरजहून रोज येतात
रोज सकाळी मिरजहून कोल्हापूरात यायचे दिवसभर मोबाईल चोरायचे अन सायंकाळी पुन्हा रेल्वेने मिरजला जायचे असाही दिनक्रम मिरजमधील मोबाईल चोरट्यांचा सुरु आहे. त्याशिवाय कोल्हापूरात मोबाईल चोरीला पर्वणी असल्याने आता बिहारच्या युवकांच्या टोळ्याही मोबाईल चोरीसाठी कोल्हापूरात आल्याची पोलिसांकडे माहिती आहे.
९० टक्के तक्रारी नाहीत, एक टक्का उघडकीस
मोबाईल चोरीच्या पोलीस ठाण्यात नोंदीसाठी ९० टक्के नागरीक पुढे येत नाहीत. फक्त सीमकार्ड ऑनलाईन बंद करुन गप्प राहतात. तसेच जे तक्रार देतात, त्यापैकी फक्त एक टक्केच मोबाईल सापडल्याच्या पोलिसांकडे नोंदी आहेत.
‘खोलखंडोबा’ परिसरातील फूटेज व्हायरल
चार दिवसापूर्वी शुक्रवार पेठेतील ‘खोलखंडोबा मंदीर’ परिसरात भीक मागणार्या महिलांसोबतचा मुलगा घराचा दरवाजा उघडून आत जाऊन मोबाईल चोरुन नेल्याचे सीसी टिव्ही फुटेज व्हायरल झाले. अशाच पध्दतीने मुलांचा मोबाईल चोरीसाठी सर्रास वापर होत आहे.