कागल पंचायत समिती समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाइल वापसी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:28 AM2021-08-27T04:28:03+5:302021-08-27T04:28:03+5:30
मोबाइल इंटरनेट प्रॉब्लेम, सर्वर डाऊन, मोबाइलमध्ये बिघाड, इंग्रजीत माहिती भरणे, मोबाइल दुरुस्तीसाठी भरमसाठ पैसे या त्रासाचा सामना करत काही ...
मोबाइल इंटरनेट प्रॉब्लेम, सर्वर डाऊन, मोबाइलमध्ये बिघाड, इंग्रजीत माहिती भरणे, मोबाइल दुरुस्तीसाठी भरमसाठ पैसे या त्रासाचा सामना करत काही अंगणवाडीसेविकांना शाळा बंद झाल्यानंतर रेंजसाठी डोंगर अथवा टेकडीवर जावे लागत आहे.
निवडणुकांच्या तोंडावर मोबाइल खरेदी केले आहेत. ठरलेल्या कंपनीचे मोबाइल न देता वेगळ्याच कंपनीचे मोबाइल माथी मारले आहेत. हलक्या प्रतीचे मोबाइल दिल्यामुळे सतत तक्रार सुरू आहे. काही मोबाइल बंद पडले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दुकानात भरमसाठ दुरुस्ती खर्च घेतला जातो. दुरुस्तीच्या नावाखाली दुकानदाराने घेतलेली रक्कम जाते कुठे? असा सवाल करत खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून हलके मोबाइल दिले असल्याचे दिघे यांनी सांगितले.
सातवी-आठवी झालेल्या अंगणवाडी शिक्षिकेला इंग्रजीत माहिती भरताना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. इंटरनेट, सर्व्हर डाऊन, मोबाइल हँग होणे ते बंद पडणे दुरुस्तीला येणारा वारेमाप खर्च यामुळे सेविका त्रस्त आहेत. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने मोबाइल परत देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी सेविकांनी मोबाइल वापसी आंदोलन केले.
महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी विद्या लांडगे यांनी वरिष्ठांच्या सूचना नसल्याने मोबाइल परत घेण्यास नकार दिला, मात्र उपस्थित सेविकांनी सर्व मोबाइल कार्यालयात ठेवून आंदोलनाची सांगता केली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव सुवर्णा तळेकर, शहराध्यक्षा कुसुम पवार यांनी केले.