कळंबा कारागृहात सापडला मोबाईल, सिमकार्ड, कारागृहाने पोलिसांना दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:05 PM2020-11-12T13:05:13+5:302020-11-12T13:07:51+5:30
kalmbajail, police, kolhapurnews, crimenews कळंबा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील कैद्याला टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी दिवसभर कळंबा कारागृहाची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये एक मोबाईल संच व सिमकार्ड मिळाल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील कैद्याला टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी दिवसभर कळंबा कारागृहाची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये एक मोबाईल संच व सिमकार्ड मिळाल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका पुण्यातील कैद्यास टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. यासाठी वैभव विवेक कोठारी (वय २४), संदेश नितीन देशमुख (२०), अमित सुनील पायगुडे (२५, सर्व रा. पुणे) तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांनी टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरून ते चेंडू कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून पलीकडे आत फेकून संबंधित कैद्याला गांजा पोहोच करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी संशयित तिघांनी कारागृहाच्या भिंतीवरून आत चेंडू फेकले का? त्यांचे संबंधित कैद्याशी कनेक्शन कसे जुळले? या तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनास पत्र पाठवून तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी संपूर्ण कारागृहाची तपासणी केली असता आतील बाजूस उघड्यावर एक बेवारस मोबाईल व सिम कार्ड मिळून आल्याचे पत्र प्रशासनाने पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मोबाईल व सिम कार्ड जप्त केले आहे. चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर आतील कैद्याने हा मोबाईल फेकून दिला असल्याची शक्यता पो. नि. जाधव यांनी व्यक्त केली.
(तानाजी)