कोल्हापूर: कळंबा कारागृहात गांजापाठोपाठ ‘स्पीड पोस्टा’ने मोबाइल, चार्जरही; सुरक्षेची एैसी-तैशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:11 PM2022-08-03T16:11:05+5:302022-08-03T16:36:44+5:30
स्पीड पोस्टाच्या टपालामध्ये श्रीमान योगी ही कादंबरी होती. याच कादंबरीमध्ये काही पाने कापून आत एक मोबाइल संच, चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपविले.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी गांजा या अमली पदार्थापाठोपाठ आता मोबाइल, चार बॅटऱ्या व चार्जर हे स्पीड पोस्ट टपालाने पाठवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तुरुंगाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुभाष संतोष गायकवाड (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी कैद्यांसाठी आलेली पत्रे तपासत असताना गांजा या अमली पदार्थाचा पाला स्पीड पोस्टाने कैदी मित्रासाठी पाठवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता स्पीड पोस्टाच्या टपालातून पाठवलेल्या पुस्तकात एक मोबाइल संच, मोबाइलच्या चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपवून पाठवल्याचे उघड झाले.
सुभाष वाघमोडे (रा. कोल्हापूर) यांनी कारागृहातून जामिनावर बाहेर पडलेला न्यायालयीन कैदी अक्षय दत्तात्रय कोकणे याच्या नावे रजिस्टर पोस्टाने पाठवल्याचे आढळले. यामुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे दिसून आले. त्यामुळे तुरुंगाधिकारी (श्रेणी २) निशा दिलीपकुमार श्रेयकर (रा. कळंबा कारागृह शासकीय निवासस्थान) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कादंबरीत लपवला मोबाइल
स्पीड पोस्टाच्या टपालामध्ये श्रीमान योगी ही कादंबरी होती. याच कादंबरीमध्ये काही पाने कापून आत एक मोबाइल संच, चार बॅटऱ्या, चार्जर असे साहित्य लपविल्याचे पत्रे तपासणारा कैदी महेश सुरेश पाटील याला दिसून आले. त्यांनी ही बाब तुरुंगाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.