खंडणीप्रकरणी किशोर माकडवाला गँगविरुद्ध मोक्का कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 10:50 AM2020-12-03T10:50:45+5:302020-12-03T10:54:17+5:30
खंडणीप्रकरणी किशोर माने, त्याचा भाऊ किरण माने यांच्यासह सहाजणांच्या किशोर माकडवाला गँगविरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर : खंडणीप्रकरणी किशोर माने, त्याचा भाऊ किरण माने यांच्यासह सहाजणांच्या किशोर माकडवाला गँगविरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली.
गोकुळ शिरगाव पोलिसांनी या टोळीविरोधात दाखल प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. त्यानुसार या टोळीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.
कारवाईतील संशयितांची नावे अशी : टोळीप्रमुख किशोर दडप्पा माने (रा. इंदिरानगर, शिवाजी पार्क), राकेश बाळू कांबळे (रा. महालक्ष्मीनगर, कदमवाडी), विशाल जयसिंग मछले (रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा), इरफान सिकंदर शेख (रा. आंबेडकर हॉलमागे, राजेंद्रनगर), राहुलसिंग तुफानसिंग दुधाणे (रा. विचारेमाळ, सदर बाजार), किरण दडाप्पा माने (रा. साळोखे पार्क).
यापैकी किरण माने हा अद्याप गायब असून इतरांवर अटकेची करवाई केली आहे. पोलीस तपासात ह्यकिशोर माकडवाला गँगह्णचा प्रमुख किशोर माने व त्याचे साथीदार २०११ पासून संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामगार ठेकेदार जामिऊल अन्सरुल हक (वय ३९, रा. मूळ मुर्शिदाबाद, कोलकाता, सध्या रा. तामगाव, ता. करवीर) यांचे दि. २८ ऑगस्ट रोजी ह्यकिशोर माकडवाला गँगह्णच्या प्रमुखांनी चारचाकी गाडीतून अपहरण करून त्यांना दोन दिवस चंदगडसह गोकुळ शिरगाव (ता. करवीर) परिसरात फिरविले.
परराज्यांतून येऊन भरपूर पैसे कमवतोस, त्यामुळे तुला हप्ता द्यावा लागेल, असे सांगून त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन, अंगठी, खिशातील पैसे असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन खंडणीची मागणी केली. त्यानंतर तक्रारीनुसार पोलिसांनी किशोर माकडवाला गँगच्या पाचजणांना दि. ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली; तर किरण मानेचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.
अटकेतील सर्व संशयित हे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या टोळीविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश दिले.
टोळीविरुद्ध गुन्हेगारीचा आलेख
किशोर माकडवाला गँग टोळीविरुद्ध शाहूपुरी, जुना राजवाडा, शाहूवाडी, राजारामपुरी ठाणे, आदी कार्यक्षेत्रांत २० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये खून, जबरी चोरीचा प्रयत्न, दरोडा, पोक्सोसह विनयभंग, गंभीर दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, दंडाधिकारी आदेशाची अवमानना, मालमत्ता कायदा यांचा प्रत्येकी १ गुन्हा; गर्दी, मारामारी, अपहरणासह खंडणीचे प्रत्येकी दोन गुन्हे, दुखापतीसह जबरी चोरी पाच, जबरी चोरी तीन असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी १८ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.