शिवाजी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 02:28 PM2021-03-19T14:28:07+5:302021-03-19T14:30:15+5:30
Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची मॉक टेस्ट (सराव परीक्षा) गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थांनी मॉक टेस्ट दिली आहे. या सत्रातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी निवडला आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची मॉक टेस्ट (सराव परीक्षा) गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थांनी मॉक टेस्ट दिली आहे. या सत्रातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी निवडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने स्थापन केलेल्या गुळवणी समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए., बी.व्होक., बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईनिंग, फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३२४ परीक्षा होणार आहेत.
एक तासाची ५० गुणांची बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यासाठीची मॉक टेस्ट विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने गुरुवारपासून सुरू केली. ही टेस्ट दि. २२ मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ही टेस्ट देता येणार आहे. त्याबाबतची माहिती त्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी सांगितले.
अभियांत्रिकी, लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिलमध्ये
या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी बैठक नियोजन समितीची बैठक झाली. त्यातील चर्चेनुसार बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १ एप्रिल, तर लॉ (विधी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ५ एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा नियोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. मेघा गुळवणी यांनी दिली.
एका दिवसातील चार विविध सत्रांमध्ये परीक्षा होतील. एम.बी.ए., एम.कॉम., अशा ज्या अभ्यासक्रमांचे प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा आहेत, या परीक्षा महाविद्यालय पातळीवर होणार आहेत.