राज्य सरकारकडून शेतकरी व उद्योजकांची चेष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:27+5:302021-08-19T04:27:27+5:30
इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी ...
इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, महापुराला अनेक कारणे आहेत. नद्यांना बांधलेले पूल, रस्त्यासाठी टाकलेले भराव, अलमट्टी धरणापर्यंतचा डहाळ, नद्यांची पाणी धारण क्षमता कारणीभूत आहे. १०३ पुलांवर कमानी बांधून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवावे. राज्य शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन दबडे यांनी स्वागत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष रामदास कोळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अरुण पाटील, दत्ता माने, सदा मलाबादे, संजय बेडक्याळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब शहापुरे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, निवृत्ती शिरगुरे, विकास चौगुले, आदी परिश्रम घेत आहेत.
फोटो ओळी
१८०८२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत पूरग्रस्तांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, रवी रजपुते, दत्ता माने, राजू आलासे, आदी उपस्थित होते.