पिराचीवाडीतील वैकुंठभूमी ठरतेय ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:52 PM2018-08-12T23:52:36+5:302018-08-12T23:52:50+5:30
म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होईल असे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ व विस्तीर्ण परिसर गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरच डोंगराच्या कुशीत उभारलेली ही वैकुंठभूमी होय.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून केवळ सहा महिन्यांत पिराचीवाडी गावच्या कायापालटाचा ध्यास घेऊन सरपंच भोसले यांनी विकासकामांचा पाठपुरावा केला. त्यामुळे गावातील विकासकामांसाठी केवळ सहा महिन्यांत १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गावातील अनेक कामे सुरू आहेत.
कागल तालुक्यातील उंच ठिकाण असणारे हे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. मुळात निसर्गाचे वरदान लाभलेल्या याठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांचा फंड, जनसुविधा योजना, लोकसहभाग व १४ व्या वित्त आयोगातून १५ लाखांचा निधी खर्च करून वैकुंठभूमीची उभारणी केली आहे.
गावापासून दोनशे मीटर अंतरावर उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी असणाºया मोकळ्या जागेत या वैकुंठभूमीची उभारणी केली आहे. १०० बाय ७० इतक्या क्षेत्रात आकर्षक स्वागतकमान, सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक, नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी, सावलीसाठी मोठ्या झाडांसह शोभेची फुलझाडे यामुळे या वैकुंठभूमीचे सौंदर्य पाहतच बसावे असे बनविले आहे. हे काम अत्यल्प काळात पूर्णत्वाकडे गेले आहे.
दरम्यान, गावकºयांना येथील धुरासह राखेमधून कोणतेही प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच या वैकुंठभूमीच्या सहभोवती अत्याधुनिक चेनलिंगचे कंपाऊंड करण्यात आले आहे.
मीही अचंबित झालो : मुश्रीफ
ज्या-ज्या गावात राष्ट्रवादीची सत्ता आहे,तेथे दर्जेदार विकासकामे होण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असतो. एखाद्या व्यक्तीने गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला तर काय बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिराचीवाडी गाव होय.
सरपंच सुभाष भोसले यांनी गावात विकासाचे मॉडेल बनविले आहे. त्यांनी साकारलेली जिल्ह्यातील एकमेव वैकुंठभूमी पाहून तर मीही अचंबितच झालो. अशा कार्यपद्धतीला आपल्या नेहमीच शुभेच्छा आणि पाठबळ राहील, अशी प्रतिक्रिया देत आमदार हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले.