प्रारूप प्रभाग रचना जाहीर, राजकीय हालचालींना वेग; आता आरक्षणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:32 PM2022-02-02T12:32:37+5:302022-02-02T12:32:56+5:30

प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे साधारणत: आपला प्रभाग कसा राहील याची माहिती नागरिकांना झाली. त्यामुळे राजकीय हालचालीही सुरू झाल्या.

Model ward composition for Municipal General Election 2022 announced | प्रारूप प्रभाग रचना जाहीर, राजकीय हालचालींना वेग; आता आरक्षणाकडे लक्ष

प्रारूप प्रभाग रचना जाहीर, राजकीय हालचालींना वेग; आता आरक्षणाकडे लक्ष

Next

कोल्हापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२साठी प्रारूप प्रभागरचना शहरातील पाच ठिकाणी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यावर सुनावणी, हरकतीनंतर अंतिम प्रभागरचना ४ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ७ मार्चला प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे साधारणत: आपला प्रभाग कसा राहील याची माहिती नागरिकांना झाली. त्यामुळे राजकीय हालचालीही मंगळवारपासूनच सुरू झाल्या.

महापालिकेची मुदत १५ नोव्हेंबर २०२०ला संपल्याने सद्या प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे याच काम पाहत आहेत. राज्य निवडणूक आयोगाचा एप्रिल-मेमध्ये निवडणूक घेण्याचा प्रयत्न आहे. त्रिसदस्य निवडणूक पद्धतीमुळे पूर्वीचे ८१ प्रभाग कमी होऊन ते ३१ झाले. यामध्ये ९२ नगरसेवक असणार आहेत. ८१ प्रभागांचा भाग ३१ प्रभागात समाविष्ट झाला आहे. 

नव्या प्रभागरचनेचा आराखडा महापालिका निवडणूक प्रशासाने १५ जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्याला आयोगाने मान्यता दिली. त्यानंतर प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. नव्या प्रभागात कोणत्या दिशेला कोणता भाग समाविष्ट होणार हे समोर आले आहे. प्रभागाच्या हद्दी समजल्या आहेत. यामुळे प्रभागाची व्याप्ती किती असेल, हे स्पष्ट झाले आहे. 

एका प्रभागात १६ हजारांवर ते १९ हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. याशिवाय कोणत्या प्रभागात अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीची किती लोकसंख्या आहे, हेही जाहीर केले आहे. हे पाहण्यासाठी इच्छुक आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ दिवसभर राहिली.

सन २०२१मध्ये मुदत संपली

महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये संपली. कोरोनामुळे निवडणूक लागली नाही. परिणामी सध्या महापालिकेवर प्रशासक कार्यरत आहे. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.

आता आरक्षणाकडे लक्ष

प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांचे आरक्षण प्रक्रियेकडे लक्ष लागून राहिले आहे. महिलांसह विविध प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार निश्चित करण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे.

येथे करण्यात आली प्रसिद्ध

- महापालिकेच्या गांधी मैदानाजवळील बाळासाहेब खराडे पॅव्हेलियन हॉल.
- केशवराव भोसले नाट्यगृह.
- राजारामपुरीतील जगदाळे हॉल.
- विवेकानंद कॉलेजजवळील नागाळा पार्क हॉल.
- सासणे मैदानातील मुख्य निवडणूक कार्यालय.

ऑनलाइन पाहण्यासाठी 

- http://kolhapurcorporation.gov.in:2026

- http://kolhapurcorporation.gov.in:2026/index.html

- http://kolhapurcorporation.gov.in

पुढील प्रक्रिया अशी :

१ फेब्रुवारी : प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध
१४ फेब्रुवारी : १४ फेब्रुवारीअखेर हरकती दाखल करता येणार
१६ फेब्रुवारी : निवडणूक आयोगाकडे हरकतींचा अहवाल देणे
२६ फेब्रुवारी : हरकतींवर सुनावणी
२ मार्च : निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल
४ मार्च : अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार
७ मार्च : प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया सुरू

Web Title: Model ward composition for Municipal General Election 2022 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.