शिवाजी विद्यापीठात साकारले आधुनिक तंत्रज्ञान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:44 AM2017-10-17T00:44:44+5:302017-10-17T00:44:44+5:30
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकासाचे पाऊल शिवाजी विद्यापीठाने टाकले आहे. इंडो-जर्मन टूल्स रूम अंतर्गत विद्यापीठात अॅडव्हॉन्सड टेक्नॉलॉजी सेंटर साकारले आहे. या केंद्रांतर्गत कमी कालावधीच्या विविध बारा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स रूम (आयजीटीआर) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानंतर विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान केंद्राची (एटीसी) सुरुवात केली आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थी, विविध कंपन्यांमध्ये कार्यान्वित असलेले अभियंते, कर्मचाºयांना तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील नवसंशोधन, ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विविध बारा अभ्यासक्रम सुरू केले आहे. त्यामध्ये अॅटोकॅड, सॉलिड वर्क, सीएनसी प्रोग्रॅमिंग, रिवीट आर्किटेक्चर, थ्री डीएस मॅक्स, स्काडा, आदींचा समावेश आहे. या ‘एटीसी’द्वारे पुस्तकीज्ञानासह प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास साधला जाणार आहे.
प्रगत संशोधन, नवीन अभ्यासक्रम
देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने इंडो जर्मन टूल्स रूमची स्थापना केली. भारत सरकार,जर्मनीचे संघिय प्रजासत्ताक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या ‘आयजीटीआर’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता साधने, प्रशिक्षित कर्मचारी, मार्गदर्शन केले जाते. या सुविधा शिवाजी विद्यापीठातील उपकेंद्रामध्ये उपलब्ध असणार आहेत. सामंजस्य करार झाल्यामुळे विद्यापीठ आणि आयजीटीआर हे प्रगत संशोधनाची सोय, नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य प्रशिक्षण व विकास याबाबत एकत्रितपणे काम करणार आहेत.
दिवाळीनंतर अभ्यासक्रमांची सुरुवात
अॅडव्हॉन्सड टेक्नॉलॉजी सेंटर (एटीसी) हे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला विद्यापीठाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, इंडो-जर्मन टूल्स रूमच्या सहकार्यातून याठिकाणी उद्योगविश्वाला आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्यासाठी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत पहिला टप्प्यात बारा अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीनंतर या अभ्यासक्रमांची सुरुवात होईल. कौशल्य विकासासह जे कुशल आहेत, त्यांच्यातील कौशल्य अधिक वाढविण्यासाठी ‘एटीसी’ उपयुक्त ठरणार आहे. एटीसी हे सर्वांसाठी खुले राहणार आहे.