मोदी-काँग्रेस समर्थकांत गळपट्टी धरण्यापर्यंत घमासान, सोशल मीडियावरील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 04:51 PM2019-03-06T16:51:13+5:302019-03-06T16:55:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस समर्थकांत एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर एकेरी भाषा वापरून गळपट्टी धरण्यापर्यंतचे वाद सोशल मीडियावर सुरूझाले आहेत. निवडणुका अजून दीड महिना लांब असतानाही कार्यकर्त्यांत मात्र आतापासूनच वाक्युद्ध सुरू झाले आहे. मुख्यत: व्हॉटस् अॅपवरील विविध ग्रुप हे वादाचे मूळ ठरत असून, त्यावर पोलिसांनी आतापासूनच काहीतरी प्रतिबंध घालण्याची गरज जाणवू लागली आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस समर्थकांत एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर एकेरी भाषा वापरून गळपट्टी धरण्यापर्यंतचे वाद सोशल मीडियावर सुरू झाले आहेत. निवडणुका अजून दीड महिना लांब असतानाही कार्यकर्त्यांत मात्र आतापासूनच वाक्युद्ध सुरू झाले आहे. मुख्यत: व्हॉटस् अॅपवरील विविध ग्रुप हे वादाचे मूळ ठरत असून, त्यावर पोलिसांनी आतापासूनच काहीतरी प्रतिबंध घालण्याची गरज जाणवू लागली आहे.
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ले केल्यानंतर मोदी समर्थकांना चांगलाच चेव आला आहे. त्यांच्यादृष्टीने आता निवडणूक अगदीच एकतर्फी झाली असून, भाजपच्या खासदारांची फक्त मतेच मोजायची शिल्लक राहिली आहेत. त्याअनुषंगाने भाजपच्या सोशल मीडिया ब्रिगेडकडून त्याअर्थाचे मेसेजही व्हायरल केले जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे ब्रँडिंग मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
सोशल मीडियावर विविध समाज घटकांचे व्हॉटस अॅप ग्रुप आहेत. त्यामध्ये सर्वच स्तरांतील व वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा मान्य असलेले लोक असतात; त्यामुळे मोदी समर्थकांनी त्यावर काही शेअर केले, की त्यास काँग्रेस समर्थकांकडून लगेच प्रत्युत्तर दिले जाते. जो असे प्रत्युत्तर करतो, त्याला भाजप-मोदी समर्थकांकडून जोरदार ट्रोल केले जात आहे. त्यातून काहीजण ग्रुप सोडून जात आहेत.
सोमवारचीच गोष्ट, कोल्हापुरातील एका ग्रुपवर पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर ‘माकप’ने कारवाई केल्याचे ब्रेकिंग एका वृत्तवाहिनीच्या बातमीदाराने शेअर करताच एका मोदी समर्थकाने लगेच ‘आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नव्हे का..? अशी प्रतिक्रिया शेअर केली.
‘भाजप’चे ज्येष्ठ नेते व निष्णात वकील एस. एस. अहुवालिया यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात कोण ठार झालेले नाही, असे विधान केले आहे. ती पोस्ट काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शेअर केली व मोदी समर्थक महिला कार्यकर्तीला आता तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवणार का? अशी विचारणा केली. अशा पोस्ट शेअर होऊ लागल्याने ग्रुपमध्येही कटूता निर्माण होत आहे. राजकीय पोस्टबद्दल राग येणारेही अनेक लोक अशा ग्रुपवर आहेत. त्यांच्यातून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
हे लोण ग्रामीण भागातही जास्त आहे. आता प्रत्येक गावांचे आपली माणसे, गावांतील माणसे, आपला गाव असे ग्रुप आहेत. गावांतील बऱ्या-वाईट घटना त्यावर शेअर होतात. प्रत्येक गावात प्रत्येक पक्षांचे समर्थक आहेत; त्यामुळे एकाने त्यावर एखादी राजकीय पोस्ट शेअर केली, की ती मोदी किंवा काँग्रेसला नव्हे, तर व्यक्तीगत आपल्यालाच उद्देशून केल्यासारखी त्यास एकेरीवर जाऊन प्रत्युत्तरे दिली जात आहेत. त्यातून शब्दाला शब्द वाढून एकमेकांची उणीदुणीच नव्हे, तर गळपट्टी धरण्याची भाषा केली जात आहे.
एका गावातील आहोत म्हणून एकमेकांची सुखदु:खे कळावीत, यासाठी स्थापन झालेले ग्रुप राजकारणांमुळे एकमेकांचे शत्रू ठरत आहेत. कोणीही जिंकला तरी आपले रोजचे प्रश्न जे आहेत, त्यात फारसा फरक पडत नाही आणि अडीअडचणीला आपलीच माणसे आपल्या मदतीला येणार आहेत, हा विचार न करता कटूता वाढेल, असा व्यवहार या ग्रुपमधून होत आहे.
आता लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत. त्यामध्ये दोनच उमेदवार आहेत. त्यानंतर विधानसभेला तर यापेक्षा जास्त चुरस होणार आहे. सोशल मीडियावरील ही भांडणे त्यावेळी किती टोकाला जातील याबद्दल जाणकारांच्या मनांत आतापासूनच भीतीचे काहूर उठू लागले आहे.